गोविंदा खोटारडे, त्यांच्याशी कधीच मैत्री होऊ शकत नाही; राम नाईक यांनी साधला निशाणा

अभिनेता गोविंदा याने दोन दिवसांपूर्वी मिंधे गटात प्रवेश केला. त्याने मिंधे गटात प्रवेश करताच 2014 साली मिंधेचा मित्र पक्ष असलेल्या भाजपचे नेते राम नाईक यांनी गोविंदावर केलेल्या आरोपांच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या. राम नाईक यांनी 2014 मध्ये त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या गोविंदावर त्याचे दाऊदसोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. दरम्यान गोविंदाच्या मिंधे गटातील प्रवेशानंतर राम नाईक यांनी पुन्हा प्रसारमाध्यमासमोर येत गोविंदावर निशाणा साधला आहे.

”मी गोविंदा यांना चांगलाच ओळखून आहे. त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून मला हरवले होते. त्यांच्याशी मैत्रीाचा कधी होऊच शकत नाही. गोविंदा खोटारडे आहेत. त्यांनी याआधी दोन ते तीन वेळा आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. त्यांनी राजकारणात कधीच परतणार नाही असे सांगितलेले. मात्र आता ते परत आले आहेत, असा टोला राम नाईक यांनी गोविंदाला लगावला.

दाऊदवाल्या वक्तव्यावर कायम

”गोविंदा यांनी निवडणूकीत दाऊदची मदत घेतल्याच्या माझ्या आरोपावर मी कायम आहे. कुणी कधीच माझ्या त्या आरोपांवर आक्षेप घेतला नाही. माझ्या पुस्तकातही मी त्या आरोपाचा उल्लेख केला आहे. पुस्तक प्रकाशित होऊन सात ते आठ वर्ष झाली मात्र इतक्या वर्षात काहीही झालेले नाही, असे राम नाईक यांनी सांगितले. टीव्ही 9 मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भाजपची प्रतिक्रीया बघण्यासारखी – संजय राऊत

गोविंदाच्या मिंधे गटातील एन्ट्रीवरूनही संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ”गोविंदा जेव्हा काँग्रेसकडून निवडणूक लढत होता तेव्हा भाजपचे उमेदवारी राम नाईक यांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. आता त्याच गोविंदाने भाजपच्या मित्र गटात प्रवेश केलाय. बघू आता यावर भाजपची काय प्रतिक्रीया असेल, असे संजय राऊत म्हणाले.