प्रेमात अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीची हत्या, प्रियकर अटकेत

मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कांदिवलीमध्ये एका प्रियकराने प्रेयसीच्या पतीची निर्दयपणे हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधाला अडथळा ठरत असल्यामुळे आरोपीने मयत योगेशला दारू पाजून दगडाने त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कांदिवलीच्या दामू नगर परिसरात एक मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होता. यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता मृत व्यक्तीचे नाव योगेश कांबळे असल्याचे समोर आले.लोकांनी पोलिसांना सांगितले की, योगेश कांबळे हा मजूर म्हणून काम करायचा. रवींद्र सूर्यमणी याचे योगेश कांबळे यांच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते.

रवींद्रने योगेशपासून कायमची सुटका करून घेण्यासाठी एक कट रचला.1 डिसेंबर रोजी त्याने योगेश कांबळेला अनोळखी ठिकाणी बोलावून आधी दारू पाजली. नंतर त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याला दगडाने ठेचून गंभीर जखमी केले. यात योगेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिसांनी आरोपी रवींद्रला अटक केली आहे.