साहित्य संस्थांनाही कालानुरूप बदल गरजेचा

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था 26 आणि 27 मे रोजी 119 वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याशी साधलेला संवाद.

ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. नीलिमा गुंडी यांनी पत्रिकेच्या संपादकांचे धोरण, पत्रिकेचे वैशिष्टय़पूर्ण विशेषांक, पत्रिकेतील लेखनाचे सर्वसाधारण स्वरूप, विविध सदरे, वाचकांचा प्रतिसाद तसेच पत्रिकेतील कालोचित बदल अशा बाबींचा परामर्श घेतला आहे. यात सात विभागांमध्ये 81 लेख समाविष्ट आहेत. प्रत्येक विभागालाही स्वतंत्र प्रस्तावना आहे. भाषा, व्याकरण, छंदशास्त्र, व्यक्तिवेधपर लेख, साहित्यविश्वातील विविध चळवळी, प्रवाह यांची चर्चा, वाद, महत्त्वाच्या पुस्तकांची प्रदीर्घ परीक्षणे, मुलाखती, संशोधने, इतकेच नव्हे तर परभाषेतील महत्त्वाच्या कलाकृतींची दखल घेणारे लेख, असे विविधांगी लेखन यात समाविष्ट आहे.

वि. मो. महाजनी, गं. बा. सरदार, धर्मानंद कोसंबी, द. वा. पोतदार, वि. वा. शिरवाडकर, भालचंद्र नेमाडे, गंगाधर पानतावणे, इंदिरा संत, दि. के. बेडेकर, पु. ल. देशपांडे, मं. वि. राजाध्यक्ष, ना. ग. जोशी, रा. श्री. जोग, रंगनाथ पठारे, वसंत आबाजी डहाके, सु. रा. चुनेकर, रा.ग. जाधव, कमल देसाई, श्रीरंग संगोराम, विलास खोले, श्री. के. क्षीरसागर, वीणा देव, द. दि. पुंडे, गं. ना. जोगळेकर, गो. म. कुलकर्णी, व. दि. कुलकर्णी, चंद्रशेखर बर्वे या मान्यवर लेखकांनी पत्रिकेसाठी लेख लिहिले त्यांचा समावेश या ग्रंथात आहे.

मसापने ग्रामीण भागात साहित्याचा प्रचार आणि प्रसार केला. आज शहरात सांस्कृतिक अजीर्ण होईल इतके कार्पाम होत असतात. खरी सांस्कृतिक भूक आहे ती ग्रामीण भागात. हे लक्षात घेऊन साहित्य परिषदेने कार्यक्षेत्रातील छोटय़ा गावातही आपल्या शाखांचा विस्तार केला. तिथल्या नव साहित्यिकांना विभागीय साहित्य संमेलन, युवा साहित्य नाटय़ संमेलन, समीक्षा संमेलन आणि शाखा मेळावा या रूपाने व्यासपीठ मिळवून दिले. ग्रामीण भागात शाखा चालवताना प्रश्न असतो तो निधीचा. त्यावरही साहित्य परिषदेने मार्ग काढीत साहित्यसंस्था साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले.

भाषाविषयक काम

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने लोक चळवळ उभारली, त्यासाठी लेखकांच्या बैठका, पंतप्रधान कार्यालयाला शालेय विद्यार्थ्यांमार्फत एक लाख पत्रं पाठविण्याचा उपाम, राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी पत्रव्यवहार आणि नेत्यांच्या गाठी-भेटी हे सारे करीत असताना राजधानी दिल्लीत जाऊन धरणे आंदोलनही केले. महाराष्ट्रातील साहित्य संस्थेने भाषिक प्रश्नासाठी थेट राजधानीत जाऊन आंदोलन करण्याची ही घटनाच ऐतिहासिक व अभूतपूर्व होती. मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यात यावा यासाठी विविध संस्थांनी मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या धरणे आंदोलनात साहित्य परिषदेचा लक्षणीय सहभाग होता. भाषाभगिनीमधील स्नेह वृद्धिंगत व्हावा यासाठी विद्यमान कार्यकारी मंडळाने आजवर वैदेही, प्रतिभा राय, सितांशू यशचंद्र, अशोक वाजपेयी, सूर्यबाला, रामचंद्र गुहा या देशातील मान्यवर लेखकांना वर्धापन दिन, पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले. या वर्षी साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक प्रमुख पाहुणे आहेत.

संमेलनाध्यक्ष पदासाठी ‘सन्मानपूर्वक’ निवड

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया होती तेव्हा प्रतिभावंत सारस्वतांना मतांसाठी याचना करावी लागत होती. मतदारांची पात्रता ते साहित्यसंस्था प्रमुखांची भूमिका या साऱयाविषयीच आक्षेप घेतले जात होते. निवडणुकांच्या गदारोळात वातावरण कलुषित व्हायचे. त्यामुळेच अनेक थोर सारस्वत या निवडणुकीपासून आणि संमेलनाध्यक्षपदापासून दूरच राहिले. समाजमनातही त्याविषयी खदखद होतीच. हे जाणून घेतल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात घटना दुरुस्ती व्हावी यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ठाम भूमिका घेऊन निवडणुकीऐवजी सन्मानपूर्वक निवड या पर्यायाचे समर्थन केले. सर्व संस्थांच्या सहमतीने हा पर्याय स्वीकारला गेला आणि डॉ. अरुणा ढेरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. जयंत नारळीकर, भारत सासणे, नरेंद्र चपळ गावकर, रवींद्र शोभणे असे वाचकांच्या मनातील संमेलनाध्यक्ष संमेलनांना मिळाले.

तंत्रस्नेही समाजाला साहित्य परिषदेशी जोडण्यासाठी परिषदेने फेसबुक पेज, व्हॉटस्अॅप ग्रुप सुरू करून साहित्यरसिकांना जोडले. युनिकोडचा वापर सुरू केला. कार्यकारी मंडळातील सदस्यांनी स्वत: ग्रंथ दत्तक घेऊन आणि ग्रंथप्रेमींना आवाहन करून परिषदेच्या वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन केले. मराठी वाङ्मयाचा इतिहास, ई-बुक रूपात आणला. परिषदेचे मुखपत्र असलेल्या साहित्य पत्रिकेला आयएसएसएन नंबर मिळवून तो अंक ई-स्वरूपात उपलब्ध करून दिला.

साहित्य संस्थांनीही कालानुरूप बदलणे गरजेचे आहे. कोरोनाच्या संकटात संस्था आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी असणे किती महत्त्वाचे आहे हे जाणवले. डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. पी. डी पाटील, यशवंतराव गडाख या विश्वस्तांच्या तसेच दुबईस्थित प्रसिद्ध उद्योजक विनोद जाधव, कृष्णकुमार गोयल यांच्या आर्थिक मदतीमुळे मूळ वास्तूला धक्का न लावता झालेल्या परिषदेतील सभागृहाच्या आणि ग्रंथालयाच्या नूतनीकरणामुळे परिषदेला कायमस्वरूपी चांगल्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले आहेत. उपाध्यक्ष राजीव बर्वे यांनी दिलेल्या देणगीतून द. के. बर्वे व्यासपीठ साकारत आहे.

महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘म. सा. पत्रिका’ या वाङमयीन नियतकालिकातील विसाव्या शतकातील निवडक लेखांचे संकलन असलेल्या ‘अक्षरधन : निवडक महाराष्ट्र साहित्य पत्रिका विसावे शतक’ या 1000 पृष्ठांच्या बृह्द ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संशोधन विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरवदिनी (27 फेब्रुवारी) करण्यात आले.

‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ हे परिषदेचे वाङमयीन नियतकालिक संस्थेच्या उदार आणि सर्वसमावेशक विचारसरणीचा वारसा जपणारे आहे. 1913 मध्ये पत्रिकेचा पहिला अंक ‘विविधज्ञानविस्तार’ ची पुरवणी म्हणून प्रकाशित झाला. 1928 पासून पत्रिका ‘त्रैमासिक‘ या स्वरूपात स्वतंत्रपणे सुरू झाली. सुरुवातीला पत्रिकेचे स्वरूप मुख्यत साहित्यिक तत्त्वचर्चा, भाषा व संशोधन यांना स्थान देणारे होते. त्यात कालानुरूप बदल होत गेले. यातील निवडक लेखांचा खंड आजवर प्रकाशित झाला नसल्याने हे कार्य दुर्लक्षित राहिले होते. ‘अक्षरधन’ मुळे पत्रिकेचे हे योगदान प्रकाशझोतात येत आहे. डॉ. नीलिमा गुंडी यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. आता हा हजार पृष्ठांचा बृह्द ग्रंथ सर्वांसाठी खुला झाला आहे. एक अव्वल दर्जाचा संदर्भग्रंथ म्हणून याचा उपयोग होईलच; शिवाय आजच्या आणि उद्याच्याही भाषाविषयक धोरणांसाठी यातून मार्गदर्शन मिळेल. या ग्रंथाची व्याप्ती आणि खोली लक्षात घेता मराठी वाङ्मय व्यवहार याचे स्वागत करील.

शब्दांकन – मेधा पालकर
[email protected]
(लेखक मराठी साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष आहेत.)