पार्किंगची माहिती करारातच द्यावी लागणार; महारेराचे विकासकांना निर्देश

विकासकांकडून सशुल्क घेतलेल्या किंवा मिळालेल्या पार्किंगबाबत वाद उद्भवू नये यासाठी महारेराने पुढाकार घेतला आहे. यापुढे घरांच्या नोंदणीनंतर दिल्या जाणाऱया नियतवाटप पत्रात आणि विक्री करारासोबत जोडपत्र देऊन त्यात पार्किंगचा आकार, रुंदी, उंची, पार्किंग क्रमांक, पार्किंगचे प्रत्यक्षातील ठिकाण याबाबतची माहिती नोंदवणे बंधनकारक असल्याचे निर्देश महारेराने विकासकांना दिले.

काही वेळा विकासकांकडून विकत घेतलेल्या पार्किंगमध्ये इमारतीच्या बीममुळे वाहन पार्क करता येत नाही, पार्किंग लहान असल्याने वाहन पार्क करता येत नाही, वाहन पार्क केल्यानंतर बाहेर पडायला जागा नाही, दरवाजा उघडताच येत नाही अशा अनेक तक्रारी पार्किंगच्या अनुषंगाने महारेराकडे आलेल्या आहेत. महारेराने याची गंभीर नोंद घेतली. घर खरेदीदारांना भविष्यात अशा समस्यांना सामोरे जायला लागू नये यासाठी महारेराने नियतवाटप पत्रात आणि विक्री करारांमध्येच पार्किंगचा सर्व तपशील असलेले जोडपत्र जोडणे बंधनकारक केले आहे. यात कुठल्याही त्रुटी राहू नयेत यासाठी या जोडपत्राचा आदर्श मसुदाही जारी केला आहे.

खुल्या पार्किंगसाठी विकासक पैसे आकारू शकत नाही

महारेराने 30 जुलै 2021ला परिपत्रक क्रमांक 36 अन्वये पार्किंगच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या होत्या. यात खुला पार्किंग एरिया हा चटई क्षेत्रात मोजला जात नसल्यामुळे त्यासाठी विकासक पैसे आकारू शकत नाही, हे स्पष्ट केलेले आहे. शिवाय गॅरेज, अच्छादित पार्किंग याबाबतही या परिपत्रकात स्पष्टपणे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.