बधीर होऊन येडपटासारखं बोलायचं नसतं! भुजबळांचा पुन्हा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे यांची टीका

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली 24 डिसेंबरची डेडलाईन जवळ येत चालली आहे. जसजशी ही तारीख जवळ येत चालली आहे तसतसं मनोज जरांगे आणि अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक युद्ध वाढायला लागलं आहे. विधानसभेमध्ये बोलताना भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्दावर बोलताना, ‘मला गोळी मारली जाऊ शकते’ असा दावा केला. भुजबळ यांनी सभागृहात एक कागद फडकावत पोलिसांचा तसा रिपोर्ट असल्याचा दावा केला. मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्या; ही झुंडशाही थांबवा असे भुजबळ यांनी म्हटले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी भूमिका सर्वच पक्षांनी घेतली आहे, मग फक्त भुजबळच टार्गेट का होतोय असा सवालही त्यांनी विचारला.

भुजबळांच्या या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना भुजबळांचा पुन्हा एकदा एकेरी उल्लेख केला. ते बधीर झालेत, त्यांना काहीच कळत नाही. वय झालेला माणूस सल्ले देऊन मार्गदर्शन करत असतो. यांचं मार्गदर्शनच बधीर आहे, असं म्हणज जरांगे पाटील यांनी टीका केली.

हिंसक आंदोलन न करण्याचे जरांगे यांचे आवाहन

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, मराठ्यांनो तुम्ही जागरूक रहा, एकत्रित रहा, हिंसक आंदोलन करू नका, आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलू नका, लवकरच आपल्याला आरक्षण मिळणार असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी बोरी सावरगावच्या जाहीर सभेत सरकारला आरक्षण द्यावेच लागेल, असा इशारा देत एकीचे बळ कायम ठेवण्याचे आवाहन केले.

अंबाजोगाई तालुक्यातील सभेदरम्यान जरांगे पाटील यांची तब्येत खालावली होती ज्यामुळे त्यांना तात्काळ अंबाजोगाईच्या रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. रात्रभर सलाईन आणि उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील मंगळवारी नियोजित केज तालुक्यातील बोरी सावरगाव येथील सभास्थळी दाखल झाले. लाखोंच्या उपस्थितीत जमलेल्या जनसमुदायाला मार्गदर्शन करताना जरांगे यांचा आवाज थरथरत होता. आवाजात थकवा जाणवत होता, मात्र तशा स्थितीतही उपस्थित मराठ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हे आपले ध्येय असल्याचे सांगून सरकारने कितीही कानाडोळा करण्याचा प्रयत्न केला तरी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे सांगितले.