अशोक चव्हाणानंतर मराठा आंदोलकांनी अडवली त्यांच्या पत्नीची गाडी

नुकतेच भाजपमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची गाडी मराठा आंदोलकांनी सोमवारी सकाळी कोंढा येथे अडवल्यानंतर सोमवारी रात्री मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांचीही गाडी अडवण्यात आली. त्यांना मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले.

नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच त्यांचे मेव्हुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी सकाळी अशोक चव्हाण हे अर्धापूर तालुक्यातील त्यांच्याच मतदारसंघात असलेल्या कोंढा येथे प्रचार बैठकीला गेले होते. मात्र गावात त्यांना येण्यास मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवून त्यांची गाडी अडवली. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना परत यावे लागले. याच दिवशी रात्री त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांच्याच भोकर मतदार संघातील मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे एका बैठकीसाठी जात होत्या. गावात त्यांची गाडी येताच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि गावात येण्यास त्यांना मज्जाव केला.

यावेळी ”मनोज जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, ”एक मराठा लाख मराठा” अशा घोषणा युवक व नागरिकांनी दिल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे अमिता चव्हाण यांना तेथून परतावे लागले. आंदोलकांचा रोष पाहता तेथे एकच गोंधळ उडाला. मराठा आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करुन अमिता चव्हाण यांना गावात येण्यास मज्जाव केला. प्रचंड घोषणाबाजी व युवकांचा मोठा समुदाय यावेळी उपस्थित होता. चव्हाण पती-पत्नींना एकाच दिवशी मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने याची चर्चा सबंध दिवसभर होत होती.