मराठा आंदोलकांची फौज पाहून मिंधे सरकार घाबरले; आझाद मैदानावर परवानगी नाकारली

लाखो मराठय़ांची फौज पाहून मिंधे सरकारची अक्षरशः झोपच उडाली. मुंबईत येऊ नका. व्यवस्था कोलमडेल, असे सांगत सरकारने मराठय़ांच्या आंदोलनाला आझाद मैदानाची परवानगी नाकारली आहे. तशा नोटिसाच पोलिसांनी आज बजावल्या. मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, आम्ही मौजमजेसाठी मुंबईत येत नाही, असे ठणकावत जरांगे रात्री उशिरा मुंबईच्या वेशीपर्यंत धडकले. वाशीतून मुंबईत चालत जाणार आणि उद्यापासून आझाद मैदानावर आंदोलनाला बसणारच, असा निर्धार त्यांनी केला आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने घोंघावत निघालेले मराठा आंदोलकांचे वादळ आज रात्री नवी मुंबईच्या एपीएमसी मार्पेटमध्ये धडकले. उद्या हे आंदोलक चालत मुंबईच्या दिशेने कूच करणार असून प्रजासत्ताक दिनापासून ते आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

मराठा आंदोलकांनी आझाद मैदानातच आंदोलनाचे व्यासपीठ बांधण्याची तयारी सुरू केली आहे अशी माहिती मराठा आंदोलनाचे वीरेंद्र पवार यांनी दिली. आम्ही यापूर्वीच सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. आंदोलन आझाद मैदानातच होणार.. आरक्षण मिळवणार, असा नाराच मनोज जरांगे-पाटील यांनी यावेळी दिला.

मुंबईत येण्याची हौस नाही…

आम्हाला मुंबईत येण्याची हौस नाही. पण मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी स्वतः चर्चेला यावे, या तिघांनी तोडगा काढावा. ही माझी विनंती आहे. ते येणार नसतील तर आम्ही मुंबईच्या दिशेने निघालोच समजा, असे जरांगे यांनी बजावून सांगितले.