मुंबईकर आहोत! लढणार आणि जिंकणारच, टी जंक्शन ते अदानी कार्यालयाचा परिसर घोषणांनी दुमदुमला

दुपारचे रणरणते ऊन, चारही बाजूंनी पोलिसांचा फौजफाटा, मीडियाचे कॅमेरे, फोटोग्राफर आणि ’धारावी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’च्या घोषणांनी शिवसेनेच्या विराट मोर्चाने अदानी कार्यालयावर चाल केली. शिवसेनेच्या भगव्या झेंडय़ाखाली सर्वसामान्य धारावीकरांबरोबच काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे पक्ष आणि भीम आर्मीच्या कार्यकत्यांनी मुंबईकर आहोत! लढणार आणि जिंकणारच, असा निर्धार बोलून दाखवला.

धारावीचा पुनर्विकास करताना धारावीकरांना विश्वासात घेऊन पारदर्शक प्रक्रिया राबवावी, धारावीकरांना 500 चौरस फुटांचे घर द्यावे, विकासाच्या नावाखाली एकही धारावीकर विस्थापित होऊ नये आणि केंद्र आणि राज्याने लादलेल्या अदानीकडून धारावीचा पुनर्विकास केला जाऊ नये, सरकारने म्हाडा आणि सिडकोच्या धर्तीवर पुनर्विकास करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या विराट मोर्चात धारावीकरांसह शिवसैनिक तसेच विविध राजकीय पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अदानीचे काही खरे नाही
मोर्चासाठी टी जंक्शन ते बीकेसीकडे जाणारी एक मार्गिका मोकळी ठेवण्यात आली होती.अदानीच्या कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांच्या जोडीला शिवसेनेचे सर्व नेते चालत होते. मागे घोषणांनी परिसर दुमदुमत होता. विराट मोर्चाला पाहून रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली ‘आता अदानीचे काही खरे नाही.’

पोलीस छावणीचे स्वरूप
शिवसेनेच्या भगव्या झेंडय़ाखाली विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पक्षांचे झेंडे घेऊन मोर्चात सहभागी झाले. त्यामुळे पोलिसांनी धारावी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱया टी जंक्शन बीट चौकीपासून ते अदानी कार्यालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आला होता.

भाजप-मिंधेंची पोस्टरबाजी फसली
शिवसेनेच्या मोर्चाची धार कमी करण्यासाठी धारावी पुनर्विकास समिती आणि भाजप आणि मिंधे सरकारने धारावीत ठिकठिकाणी पोस्टरबाजी केली. मात्र शिवसेनेवरील विश्वास आणि आपल्या मागण्यांवर ठाम असलेले धारावीकर मोर्चात सहभागी झाले आणि भाजप-मिंधे सरकारला चांगलीच चपराक मिळाली.

बहुभाषिक धारावीकरांची एकजूट
मोर्चात शिवसैनिक, भीमसैनिक, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, भाकप, विविध सामाजिक संघटना त्याचबरोबर कोळी बांधव, तमीळ बांधव, विविध छोटे-मोठे व्यावसायिक आणि सर्वसामान्य धारावीकरही या विराट मोर्चात सहभागी झाले होते. बहुधार्मिक आणि बहुभाषिक असलेल्या धारावीकरांनी रस्त्यावरही मोर्चातून आपली एकजूट दाखवून दिली.

आदित्य ठाकरे यांनी स्टेजच्या पायऱयांवर बसून ऐकले भाषण
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्य स्टेज सोडून चक्क पाय-यांवर बसून भाषण ऐकले. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यासोबत होते. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर उपस्थित होते.

या घोषणांनी आली आंदोलनाला धार
धारावी गोरगरिबांची, नाही धनदांडग्यांची
चले जाव चले जाव, अदानी चले जाव
धारावीवालो जागो, अदानी को भगावो
धारावी को बचाना है, तो अदानी को हटाना है
नाही जायेंगे, नाही जायेंगे, विकास के नाम पर नही जायेंगे
हात से हात मिलाएँगे, अदानी को भगाएँगे!
आमचा लढा जन्मभूमीसाठी, आमचा लढा कर्मभूमीसाठी!
जिथे मुंबईच्या अस्मितेचा प्रश्न गंभीर, तिथे शिवसेना खंबीर!
धारावी आमची हक्काची, नाही मोदींच्या मित्राची!
नकोत फक्त टोलेजंग इमारती, सोबत हवी धारावीची संस्कृती
मुंबईचा मराठी चेहरा, हाच धारावी पुनर्विकासाचा पॅटर्न खरा
द्या सर्व दूर ललकारी, धारावीसाठी फुंका रे एक तुतारी!

बोरिवलीच्या देवीपाडामधून 60 वर्षांचे दत्ता परुळेकर भगवा वेश आणि सायकल घेऊन सहभागी झाले. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम शिवसेनेने नेहमीच केले आहे. धारावीकरांनाही शिवसेनाच न्याय मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महामोर्चामध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते विरारवरून आलेल्या समर्थ आदावडे या अडीच वर्षांच्या चिमुकल्याने. तो वडिलांबरोबर सहभागी झाला होता. त्याच्या सायकलवरील बॅनर चर्चेचा विषय ठरला.