आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर लघवी प्रकरण: मायावती यांनी घटनेचा निषेध करत केली ‘ही’ मागणी

एका आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर भाजप नेत्याने लघवी केल्याचा किळसवाणा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रवेश शुक्ला नावाच्या व्यक्तीला अटक केली असून तो भाजपचा कार्यकर्ता आहे. यावरून बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी या लाजिरवाण्या घटनेबाबत ट्विटरवरुन निषेध व्यक्त करत आरोपीवर एनएसए कलम लावून त्याची संपत्तीही उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे.

मायावती यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीलेय की, मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील एका आदीवासी तरुणावर या स्थानिक नेत्याने लघवी केल्याचा व्हिडीओ लाजिरवाणा आहे. या अमानवीय कृत्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. हा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर हे सरकार जागे झाले त्यावरून या सरकारची असंवेदनशीलता दिसते व हे अत्यंत दुख:द आहे. मध्य प्रदेशातील भाजप सरकार आरोपीला पाठी घालत आहे. तो भाजपचा कार्यकर्ता नसल्याचे सांगण्यापेक्षा आरोपी विरोधात एनएसए कलम लावून त्याच्यावर कारवाई करावी. त्याच्या संपत्तीवर बुलडोझर फिरवावा”

या प्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर आरोपी भाजप कार्यकर्ता प्रवेश शुक्लाला मध्यरात्री अटक करण्यात आली. सीधी येथील कुबरीमध्ये आदिवासी तरुण दशमत रावत याच्यावर लघवी केल्याप्रकरणी आरोपीविरोधात एमएसएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार होता. पोलिसांनी त्याचा शोध घेत मध्यरात्री अटक केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोकांमध्ये आरोपीविरोधात संताप पसरला आहे.