धक्कादायक…. मिस युनिव्हर्स स्पर्धेत 6 सौंदर्यवतींना केले टॉपलेस; स्पर्धकांचा लैंगिक शोषणाचा आरोप, तपासाला वेग

मिस युनिव्हर्स या जागतिक स्तरावर नावाजलेल्या सौंदर्यवतींची निवड करण्याच्या स्पर्धेत लैंगिक शोषण झाल्याचा आरोप स्पर्धक तरुणींनीच केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या स्पर्धेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच अनेक मुस्लीमबहुल देशांकडून या स्पर्धेला विरोध होत आहे. त्यातच ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याने हा वाद चांगलाच ऐरणीवर आला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 6 स्पर्धेक तरुणींनी 20 जणांसमोर आपल्याला टॉपलेस करत आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनीही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घातले असून तपासाला वेग दिला आहे.

मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या 6 मुलींना अंतिम फेरी दरम्यान टॉपलेस केल्याचा आरोप आयोजकांवर आहे. पोलिसांनीही या घटनेशी संबंधित काही पुरावे मिळाल्याचे मान्य केले असून याचा तपास वेगाने सुरू आहे. राजधानी जकार्ता येथे 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान ही सौंदर्य स्पर्धा झाली. यात सहभागी झालेल्या सहा मुलींचा आरोप आहे की, त्यांना एका वेगळ्या खोलीत नेण्यात आले आणि तेथील 20 लोकांसमोर टॉपलेस होण्यास सांगितले. त्याच अवस्थेत त्यांची छायाचित्रे काढण्यात आली आणि व्हिडिओ बनवण्यात आले. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

इंडोनेशिया हा मुस्लिमबहुल देश आहे. त्यामुळे मुळातच येथील मुस्लीम संघटना अशा प्रकारच्या सौंदर्य स्पर्धांच्या विरोधात आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. इंडोनेशियन मुस्लिम संघटना कोणत्याही प्रकारच्या सौंदर्य स्पर्धांच्या विरोधात आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून त्या बंद करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्या 6 मुलींनी आरोप केला की आयोजकांनी शारीरिक तपासणीचे निमित्त करून त्यांना टॉपलेस होण्यास भाग पडले. त्यासाठी त्यांना वेगळ्या खोलीत नेण्यात आले. येथे 20 लोक उपस्थित होते. पाच मुलींना एकाच वेळी टॉपलेस होण्यास सांगितले होते, असा आरोपही करण्यात आला आहे.

मंगळवारी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आयोजकांनी याबाबत मौन बाळगले आहे. मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशननेही याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र जकार्ता पोलीस वेगाने तपास करत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कंपनीही या कार्यक्रमाशी जोडली गेली आहे. 1996 ते 2002 पर्यंत हा कार्यक्रम ट्रम्प यांच्या कंपनीने आयोजित केला होता. 1952 मध्ये पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.