मोदींना मत म्हणजे विनाशाला मत, उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

>> दुर्गेश आखाडे

देवेंद्र फडणवीस हल्ली भाजपा उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार करू लागले आहेत. पण मी सांगतो. मोदींना मत म्हणजे विनाशाला मत आहे. त्यामुळे जनतेने जागरूक रहावे, अशी साद घालत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थापाडय़ा भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कोकणात शिवसेनेचे तुफान आले असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी येथे खणखणीत सभा झाली. या सभेला अलोट गर्दी उसळली होती.

कोकणात आम्हाला प्रचार करायची गरजच नाही. कोकण हे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाचे हृदय आहे, असे भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपा, मोदी-शहा, मिंधे गट, नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रद्वेषी आहेत. कारण स्वराज्यद्वेषी औरंगजेब त्यांच्या गुजरातमध्ये जन्मला. त्याला आम्ही काय करणार. आमच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मले. ते आमचे वैभव असून देशाची शान आहेत. म्हणूनच केंद्रातील लोक महाराष्ट्राचा द्वेष करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत म्हणूनच महाराष्ट्रद्वेषापोटी मोदी-शहा संविधान बदलू पाहताहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी आज केला.

गद्दारांच्या मालकांनी शिवसेनेचे कोकणशी नाते संपवण्याचा प्रयत्न केला

कोकण हे शिवसेनेचे आणि ठाकरे कुटुंबियांचे ह्रदय आहे, अशी कृतज्ञता उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. शिवसेना पह्डण्याचा प्रयत्न झाला तरी शिवसेना नेते भास्कर जाधव, आमदार र2ाजन विचारे आणि वैभव नाईक शिवसेनेसोबत राहिले, त्यांचा मला अभिमान आहे असे प्रशंसोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले. कोकणवासियांनी वर्षानुवर्षे जपलेला धनुष्यबाण गद्दारांनी कोकणातून गायब करुन टाकला. गद्दारांना समजले नाही की दिल्लीत बसलेल्या त्यांच्या मालकांनी शिवसेनेचे कोकणाशी असलेलं नाते संपवण्याचा प्रयत्न केलाय, अशा शब्दांत उद्धव ठाकरे मिंधे गटावरही बरसले

आयपीएलचे इंडियन पॉलिटिकल लीग झालेय

सध्या आयपीएलचे दिवस सुरु आहेत. काल आपल्याकडे होता तो खेळाडू आज तिकडे गेला हे पाहून पंचाईत होते. देशाच्या राजकारणातही आता तसेच झाले आहे. आयपीएल म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग झाले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

..तर मी आत्ता प्रचार थांबवतो

15 लाख रुपये कुणाच्या खात्यात आले आहेत का? ते आल्यास मला सांगा मी प्रचार थांबवतो, असे आव्हानही यावेळी उद्धव ठाकरे यांनी देत भाजपच्या जुमलेबाजीवर टीका केली. इलेक्टोरोल बॉन्डवरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. काँग्रेसला 60 वर्षात जमले नाही ते भाजपने अडीच वर्षात कमावले, असे ते म्हणाले.

जुमलेबाजांपासून जागरूक रहा

मोदीं आणि भाजपच्या जुमलेबाजीवरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रहार केला. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचेच उदाहरण त्यांनी दिले. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झाला का. नाही. सन 3000 मध्ये पूर्ण करून देतो. तोपर्यंत मला मते द्या, अशी खिल्ली त्यांनी उडवली. कोकणातून थेट चंद्रावर पूल बांधून देतो, 3025 मध्ये. इतर कुणी देणार नाही मी बांधून देतो. अशी आश्वासने भाजपकडून दिली जातात. आता चंद्रावर पूल बांधला जाणार नाही हे माहीत असते पण बघायला काय हरकत आहे, उद्या झालाच तर. याच आशेपोटी मते देऊन आपण फसतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी यावेळी मतदान करताना जागरूक रहा असा सल्ला कोकणवासियांना दिला

रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे सभेला उपस्थित होते. व्यासपीठावर शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत, उपनेते आमदार राजन साळवी, राम वडले, aमाजी मंत्री रवींद्र माने, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, आमदार वैभव नाईक, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार गणपत कदम, शिवसेना संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, जान्हवी सावंत, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेटय़े, प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, आपचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी होते.

भाजपचे घरगडी उद्या आमचे घरगडी असतील, मग पाहतो

शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या घरावर ईडीवाल्यांनी धाड टाकली होती तेव्हा घरातील प्रत्येक साहित्याचे मूल्य निश्चित केले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचीही किंमत ठरवली होती. तो दाखला देत यावेळी उद्धव ठाकरे यावेळी भाजपवर कडाडले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत भाजपची घरगडी बनलेली ईडी ठरवणार का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. ईडी, सीबीआयचे अधिकारी कसेही वेडेवाकडे वागू लागले आहेत. उद्या इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपचे हे घरगडी आमचे घरगडी बनणार आहेत, हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला. जय भवानीच्या मुद्यावरून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जय भवानी-जय शिवाजी आमच्या हृदयातून कुणीही काढू शकत नाही. उद्धव ठाकरेंना संपवायचेना मग मैदानात उतरून तर पाहा, मी उतरलो तुम्ही देखील उतरून दाखवा, असे आव्हानही त्यांनी भाजपवाल्यांना दिले.

कोकणात विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही

बारसूमध्ये विनाशकारी प्रकल्प मिंधे सरकारने कोकणवासियांवर लादला असता. फौजा आणून विषय संपवला असता पण शिवसेना उभी राहिल्याने त्यांना यश आले नाही, असे सांगतानाच, इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर कोणताही विनाशकारी प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

महाराष्ट्रात भाजपविरुध्द शिवसेनेचा लाव्हा उसळलाय

शिवसेनेचे कोकणबरोबर असलेले नाते तोडण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. पण त्यांना माहीत नाही. कोकणात जांभा दगड आहे. कोणे एकेकाळी तो लाव्हा रस होता आणि आता संपूर्ण महाराष्ट्रात भाजपविरुध्द शिवसेनेचा लाव्हा उसळलाय, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.

एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला सर्व भ्रष्टाचारी

शिवसेना सोबत होती तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधी प्रचारासाठी महाराष्ट्रात आजच्याइतके फिरावे लागत नव्हते. 2014 मध्ये काय त्यांचा रुबाब होता. 56 इंचाची छाती होती. एक अकेला सब पे भारी असे ते विरोधकांना उद्देशून म्हणायचे. कारण शिवसेना सोबत होती. आता पहिल्यासारखा त्यांचा आत्मविश्वास राहिलेला नाही. छातीमधली सर्व हवा निघून गेली आहे. एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला सर्व भ्रष्टाचारी अशी मोदींची अवस्था झाली आहे, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली.

राणेंनी त्यांच्या साईजचा प्रकल्प तरी कोकणात आणला का?

इतके वर्ष राणेंनी स्वतःसकट स्वतःची पिलावळ मोठी केली. जिकडे सत्ता असेल तिकडे झुकले. सगळी मंत्रीपदे घेतली. आमदारकी, खासदारकी घेतली. पण माझ्या कोकणासाठी काय केले? भाजप हुशार आहे, त्यांनी राणेंच्या कुवतीप्रमाणे मंत्रीपद दिलेय. लघू आणि सूक्ष्म. एकतरी लघू किंवा सूक्ष्म, तुमच्या साईजप्रमाणे प्रकल्प कोकणात आणलात का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. निवडणुकीनंतर मायक्रोस्कोप आणावा लागेल, म्हणजे अतिसूक्ष्म कोरोनाचा विषाणू दिसेल, पण राणे दिसणार नाहीत एवढे सूक्ष्म होतील, तरीसुद्धा मस्ती किती, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी प्रहार केला.

अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल

ओरबाडून आणलेली सत्ता मिळत असेल तर मी चिमटीतही पकडणार नाही असे अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. आता नाकर्त्यांच्या हातात भाजप गेल्याने त्यांनी भाजपा खतम केला. हे पाहून अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.