जालन्यात चोरट्यांचा धुमाकूळ; 10 दिवसात दुसरं ATM फोडलं, लाखो रुपये लंपास

जालना शहरातील औद्यागित वसाहत परिसरामध्ये चोरट्यांना धुमाकूळ घातला असून 10 दिवसात दुसरे एटीएम फोडून लाखो रुपये लंपास केले याहेत. औद्योगिक वसाहत परिसरातील त्रिमूर्ती चौक येथे एसबीआय बँकेच्या बाजूला असलेले एटीएम चोरट्यांनी फोडल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून रोकड लंपास करण्यात आली.

विशेष म्हणजे 10 दिवसापूर्वी जालना शहरातील महावीर चौक येथील एसबीआयचे एटीएम चोरट्यांनी फोडून 24 लाख 54 हजारांची रोकड लंपास केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच औद्योगिक वसाहतीमधील एसबीआयचे एटीएम फोडल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्रिमूर्ती चौक येथील हे एटीएम चोरट्यांनी 3 वर्षांपूर्वीही फोडून नेले होते. त्याच्या तपासात अजून काही निष्पन्न झाल्याचे नसून आज पुन्हा सदरील घटना घडल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली.

चंदनझीरा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या त्रिमूर्ती चौकात ही घटना घडल्याने पोलिसांचा धाक राहिला नसल्याची चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरूआहे. एटीएम फोडून चोरट्यांनी किती रोकड लंपास केली याचा अजून अंदाज नसून बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आल्यानंतर त्याबाबत तक्रारीनंतरच कळून येईल. चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली.