भाजपचा पराभव निश्चित, मोदींनी आता निवृत्तीचे नियोजन करावे; जयराम रमेश यांचा टोला

लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांसाठी मतदान झाले आहे. आता अखेरच्या टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. सहा टप्प्यातील मतदान झाल्यानंतर काँग्रेसने विजयाचा मोठा दावा केला आहे. आता भाजपचा पराभव जवळपास निश्चित आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी आता निवृत्तीचे नियोजन करावे, असा टोला काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मोदी आणि भाजपला लगावला आहे. पराभव समोर दिसत असल्याने मोदी यांचा भ्रमनिरास झाला आहे, त्यामुळे मोदींनी आता निवृत्तीचे नियोजन करावे, असे रमेश यांनी म्हटले आहे. तसेच सहाव्या टप्प्यातच इंडिया आघाडीने बहुमतासाठी लागणारा 272 जागांचा आकडा गाठला आहे, असा दावाही रमेश यांनी केला. ‘दक्षिण मे साफ, उत्तर मे हाफ’ या घोषणेची पुनरावृत्तीही त्यांनी केली.

सहाव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि आता दिल्लीत मतदान झाल्यानंतर भाजपचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. इंडिया आघाडीने आधीच 272 जागांचा टप्पा ओलांडला आहे आणि एकूण 350 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. हरियाणा आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये भाजपला प्रचार करण्यात अडचणी येत आहेत. कारण स्थानिक ग्रामस्थांकडून त्यांच्या नेत्यांना हाकलून दिले जात आहे. शेतकरी आंदोलनामुळे भाजप नेत्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, असेही रमेश म्हणाले.

भाजपचा निवडणूक प्रचार लवकरच संपत आहे. तसेच भाजपचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवृत्तीचे नियोजन करण्यासाठी बराच वेळ आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दैवी शक्तीबाबतचे वक्तव्य गोंधळात टाकणारे असल्याचे म्हटले आहे. मोदींना पराभवाचे सत्य कळत असल्याने त्यांचा भ्रमनिरास होत आहे. आता त्यांनी जाहीर केले आहे की त्याचा जन्म जैविक नव्हता आणि त्यांना देवानेच पाठवले आहे. कदाचित त्यांना त्यांच्या पुढच्या कारकिर्दीत स्वतःला देव म्हणून पाहायचे असेल, अशी टीकाही रमेश यांनी केली.