Mumbai crime news : न्यायमूर्तींच्या नावाने फसवणूक; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

एका न्यायमूर्तींचे छायाचित्र  व्हॉट्सअॅप प्रोफाईलवर ठेवून त्याआधारे अज्ञात भामटय़ाने बऱ्याच जिल्ह्यातील सचिवांना व्हॉट्सअॅप संदेश पाठवले. तो संदेश तसेच भामटय़ाने संपर्क साधून सांगितल्याप्रमाणे एका जिह्याच्या सचिवाने विश्वास ठेवत 50 हजार रुपये ऑनलाईन पाठविल्याचा प्रकार समोर आला आहे. हा फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रत्येक जिह्याच्या ठिकाणी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव म्हणून काम करतात. दरम्यान, राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या एका न्यायमूर्तींचे छायाचित्र अज्ञात व्यक्तीने त्याच्या व्हॉट्सअॅप प्रोफाईलला ठेवून न्यायमूर्तींच्या नावे बनावट खाते बनवले. मग त्या माध्यमातून बऱ्याच जिह्यांतील सचिवांना व्हॉट्सअॅप संदेश पाठवले. त्या अज्ञात व्यक्तीने सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयातील भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व साहेबाचा पह्न लागत नाही, तेव्हा त्यांना पैसे पाठवायला सांगा, असे त्या व्यक्तीने कार्यालयातील मोबाईलवर सांगितले. शिवाय ज्या बँक खात्यावर पैसे पाठवायचे त्याची माहितीदेखील त्याने पाठविली. त्यानंतर कार्यालयीन कर्मचाऱ्याने सदर माहिती सचिवांना सांगितली.

न्यायमूर्तींना पैशांची गरज असावी असा समज करून सचिवांनी त्यांच्या न्यायाधीश पत्नीच्या बँक खात्यावरून अज्ञाताने दिलेल्या बँक खात्यावर 50 हजार रुपये पाठवले. दरम्यान, हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच न्यायमूर्तींच्या वतीने आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.