संगमनेरमध्ये 1750 किलो गोवंश मांस जप्त; दोघांना अटक,साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर शहरामध्ये गोवंश हत्या करून गोवंश मांस विक्री करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला असून, आज छापा टाकत 1750 किलो गोवंश मांस जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तब्बल साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहर पोलिसांनी केलेली ही धडाकेबाज कारवाई चर्चेत असून, यापुढेही कारवाई चालूच राहील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. नईम सुलतान शेख (वय 20, रा. श्रमिकनगर, संगमनेर) आणि रेहान अल्ताफ शेख (वय 19, रा. इस्लामपुरा, दिल्ली नाका, संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शुक्रवारी रात्री पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की, शहरातील कोल्हेवाडी रोड परिसरात केजीएन गॅरेजजवळ मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या एका टेम्पोमध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले मांस भरले जात आहे. याची खात्री करून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक मथुरे यांनी पोलीस उपनिरीक्षक बी. बी. घोडे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश लक्ष्मण थटार, पोलीस हेडकॉन्स्टेबल लुमा भांगरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास शिरसाट यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर रात्री पोलीस पथकाने छापा टाकला असता लाल रंगाचा आयशर टेम्पो उभा असलेला दिसला. पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला असता या टेम्पोमध्ये गोवंश जातीचे मांस भरलेले आढळून आले. येथे नईम सुलतान शेख आणि रेहान अल्ताफ शेख हे दोघे आढळून आले. त्यांच्याकडे मांस कापण्याचा आणि वाहतुकीचा कुठलाही परवाना नव्हता. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सदर मांस तपासले असता त्याचे वजन अंदाजे 1750 किलो असून, हे सर्व मांस आणि टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला.

पोलिसांनी गोमांस सॅम्पल तपासणीसाठी राखून ठेवले आहे. उर्वरित गोवंश मांसाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल योगेश लक्ष्मण थटार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. बी. घोडे हे करीत आहेत. संगमनेर शहरात होणारी गोवंश कत्तल रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. संगमनेर शहर पोलीस, उपअधीक्षकांचे पथक तसेच एलसीबीचे पथक संगमनेर येथील अवैध कत्तलखान्यांवर कारवाया करीत आहेत. त्यामुळे कोणाचीही गय केली जाणार नसून, कारवाई सुरूच राहणार आहे.
– भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर