बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्या देशात परत पाठवा; हिंदू जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर पोलिसांनी दोन बांगलादेशी घुसखोर महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड आणि पॅन कार्डही सापडले आहे. यापूर्वीही उंचगाव-गांधीनगर येथे अशा घटना घडल्या आहेत. शिवाय पुणे, सिंधुदुर्ग, नवी मुंबई येथेही अशा घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशी घुसखोरी अत्यंत घातक आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिह्यात ‘कोंम्बिंग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा आणि त्यांच्या देशात परत पाठवा’, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.

बांगलादेशातून येथे घेऊन येणाऱ्यांचा सूत्रधार कोण, यांना पारपत्र कोण बनवून देतो, यांचे स्थानिक पाठीराखे कोण याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच अशा प्रकारचे लोक हे विविध खोटी नावे धारण करून राहतात. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक घरमालकाने त्यांना कोणालाही भाडय़ाने खोली देताना त्यांची चौकशी करूनच ठेवावे, या संदर्भात आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशा प्रमुख मागण्या निवेदनात केल्या आहेत.

यावेळी शिवानंद स्वामी, दीपक देसाई, उदय भोसले, अर्जुन आंबी, सुनील सामंत, निरंजन शिंदे, राजू यादव, शशी बीडकर, अभिजीत पाटील, रामभाऊ मेथे, अनिरुद्ध कोल्हापुरे, सुरेश यादव, शरद माळी, मनोहर सोरप, नंदकुमार घोरपडे आदी सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पंचगंगा प्रदूषणावर काम सुरू – अमोल येडगे
‘पंचगंगा नदी प्रदूषणावर सध्या काम चालू असून, शहर आणि ग्रामीण भागातील सांडपाणी प्रक्रिया न करता मिसळू नये, यासाठी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहेत. दोन-अडीच वर्षे हे काम चालेल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करा
पंचगंगा नदी मोठय़ा प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे समोर आले आहे. विविध सामाजिक संघटना, महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ यांच्या संयुक्त पाहणीत 42 दशलक्ष लीटर सांडपाणी पंचगंगेत मिसळत असल्याची माहिती समोर आली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे नाल्यांमधील सांडपाणी हे मैलामिश्रित आणि काळे असून, ते फेसाळलेले होते. इचलकरंजी येथेही तीच स्थिती असल्याचे समोर आले आहे. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या सर्वच घटकांवर कडक कारवाई करावी. तसेच वर्षभर ज्या प्रमुख कारणांमुळे पंचगंगा नदी प्रदूषित होते, त्यावर प्रथम कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.