प्राणिगणनेत 200 हून अधिक प्राण्यांचे दर्शन; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात निसर्गप्रेमींनी अनुभवला थरार

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून बुद्ध पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या ‘निसर्गानुभव कार्यक्रम 2024’अंतर्गत पार पडलेल्या मचाणावरील वन्यप्राणी गणनेत निसर्गप्रेमींना 200हून अधिक वन्यप्राण्यांचे दर्शन घडले. या वनपरीक्षेत्रांतील जंगलातील 81 मचाणावर बसून निसर्गप्रेमींनी अरण्यवाचनाचा थरारक अनुभव घेतला.

बुद्ध पौर्णिमेला म्हणजे 23 मे ला ‘निसर्गानुभव कार्यक्रम 2024’ निमित्त निवडक 81 निसर्गप्रेमींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाटण, कोयना, बामणोली, कांदाट, चांदोली, ढेबेवाडी, हेळवाक आणि आंबा या वनपरीक्षेत्रातील जंगलातील 81 मचाणांवर बसून अरण्यवाचनाचा थरारक अनुभव घेण्याची संधी मिळाली. ढगाळ वातावरण, दाट धुके व पाऊस असूनसुद्धा अपुऱ्या प्रकाशात पार पडलेल्या या गणनेत बिबटय़ासह एकूण 16 सस्तन वन्यप्राणी प्रजातींचे तसेच 11 वन्यपक्षी, परीसूप प्रजातींचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले.

निसर्गानुभव कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. रामानुजम, उपसंचालक कोयना उत्तम सावंत तसेच उपसंचालक चांदोली श्रीमती नेहलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पातील आठ वनक्षेत्रपाल यांनी परिश्रम घेतले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 5 जानेवारी 2010 रोजी अस्तित्वात आला आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ 1165.57 चौ. कि.मी. आहे. व्याघ्र प्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिह्यांत येतो. पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा एकमेव आहे. येथील जंगल हे सह्याद्रीतील उर्वरित घनदाट व चांगल्या श्रेणीतील शिल्लक राहिलेले जंगल आहे. कोयना व वारणा जलाशयाच्या गाळाने भरण्यापासून संरक्षण हे जंगल करीत आहे. 15 नद्यांचा उगम या जंगलातून होतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेले कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोने घोषित केलेले ‘जागतिक नैसर्गिक वारसास्थळ’ आहे.

प्राणिगणनेत आढळलेले प्राणीः बिबट 1, गवा 91, सांबर 16, रानकुत्रा 3, रानडुक्कर 23, ससा 19, पिसोरी गेळा 1, भेकर 17, अस्वल 8, उदमांजर 5, माकड 5, साळिंदर 2, मुंगूस 3, शेकरू 7, वटवाघूळ 2. एकूण 203 प्राणी.

पक्षी व इतरः चकोत्री 5, रानकोंबडा 12, घुबड 2, सर्पगरूड 2, मोर 10 यांसह इतर असे एकूण 31 पक्षी आढळले आहेत.