पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा; पुणे विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांचे आदेश

पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन व तात्कालिक उपाययोजनांना प्राधान्य देण्यास सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी. तसेच प्रदूषण करणाऱ्या घटकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, असे आदेश पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पुलकुंडवार बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जि.प.चे सीईओ एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पुणे विभाग नगरपालिका प्रशासन उपायुक्त दत्तात्रय लाघी, जिल्हा नगर प्रशासन सहआयुक्त नागेंद्र मुतकेकर, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेचे पदाधिकारी तसेच जिह्यातील सर्व मुख्याधिकारी, अशासकीय सदस्य उपस्थित होते.

पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार सन 2014 मध्ये समिती गठीत करण्यात आली होती. यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्वच यंत्रणेचे अधिकारी समितीमध्ये असतात. पंचगंगा नदीचे प्रदूषण होऊ देऊ नये आणि त्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्यात येतात, या प्रगतीचा दर तीन महिन्याला अहवाल सादर केला जातो. या बैठकीत अशा सर्व दीर्घकालीन आणि तात्कालिक उपाययोजनांचा आढावा पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतला.

एसटीपी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी
दीर्घकालीन उपाययोजनेमध्ये कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी एसटीपी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिह्यातील उर्वरित काही ठिकाणी सांडपाण्यावर सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बसविण्याचे काम चालू असून, कामे संबंधित यंत्रणेकडून तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रदूषणामुळे मासेमारी व्यवसायावर होणारा परिणाम व जैविक घटकांना येणारी बाधा, नागरी घनकचरा, पाण्याचा अति वापर व आरोग्याच्या तक्रारीबाबतही आढावा घेतला.

पंचगंगा नैसर्गिक व प्रदूषणमुक्त प्रवाहित होण्यास प्राधान्य
तत्कालिक उपाययोजनेमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सल्ल्यानुसार पंचगंगा नदीत नव्याने कोणत्याही प्रकारे प्रदूषण होणार नाही व प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कायद्यानुसार कारवाई करावी. नैसर्गिक व प्रदूषणमुक्त पंचगंगा नदी प्रवाहित होण्यास प्राधान्य देऊन होणाऱ्या प्रदूषणाबाबत सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना पुलकुंडवार यांनी दिल्या. बैठकीनंतर पुलकुंडवार यांनी कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.