शिवराज्याभिषेक सोहळा जागतिक स्तरावर पोहोचविणार! शिवभक्तांनी स्वयंशिस्तीची वज्रमूठ बांधावी, युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वर्षपूर्तीचा यंदा दुर्गराज रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा जागतिक स्तरावर पोहोचविणार आहे. राष्ट्रीय सण म्हणून प्रत्येक शिवभक्त निष्ठsने सहभागी होतील. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असली, तरी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी अपेक्षा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.

दुर्गराज रायगडावर दि. 5 व 6 जून रोजी 350वा शिवराज्याभिषेकाचा सोहळा ‘लोकोत्सव’ म्हणून मोठय़ा थाटामाटात साजरा करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीची वज्रमूठ बांधावी, असे आवाहनही संभाजीराजे छत्रपती यांनी केले. ऐतिहासिक जुना राजवाडा येथील भवानी मंडप मंदिरात शुक्रवारी सायंकाळी समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेकाच्या पूर्वनियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित होते.

संभाजीराजे म्हणाले, ‘शिवराज्याभिषेकास यंदा 350वर्षे पूर्ण होत आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्त पाळून गडावर येणे गरजेचे आहे. समितीतर्फे गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. गडावर येताना प्लॅस्टिक कचरा होणार नाही, याची दक्षता शिवभक्तांनी घ्यावी. तसेच 5 व 6 जूनला होणाऱ्या विविध उपक्रमांत उत्साहाने सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव झाला असून, महाराष्ट्रासह देशाच्या अन्य राज्यांतून शिवभक्त गडावर दाखल होत आहेत. पारंपरिक कला, परंपरा सादर करत कलाकार सोहळ्याचा आनंद द्विगुणित करत आहेत. तसेच 1 व 2 जून रोजी समितीचे स्वयंसेवक रायगडावर जाऊन अन्नछत्रासह अन्य सुविधांची तयारी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी संदीप खांडेकर यांची निवड
संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गराज रायगड येथे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी 5 व 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. सन 1999 पासून सह्याद्री प्रतिष्ठानसह दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यात आणि दुर्ग संवर्धन मोहिमेत सक्रिय राहिलेले पत्रकार संदिप खांडेकर यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्षपदी हेमंत साळोखे, सुखदेव गिरी, उपाध्यक्षपदी अतुल चव्हाण (पुणे), सत्यजित भोसले (मुंबई), शशिकांत खुणे (धाराशिव), चैत्राली कारेकर (कल्याण) आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, समितीचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, पत्रकार सागर यादव तसेच इंद्रसेन जाधव यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे.