आईच्या अपघाती मृत्यूबाबत नुकसान भरपाईचा मुलीचा दावा; 11 वर्षांच्या मुलीला मिळणार 1.1 कोटी

माझगाव येथे 2015 मध्ये ट्रेलरने स्कूटीला धडक दिल्याने या अपघातात महिलेचा मृत्यू झाला होता. तिच्या मुलीने या अपघाती मृत्यूबाबत नुकसान भरपाईचा दावा केला होता. आता त्या मुलीला 1.1 कोटींची नुकसान भरपाई मिळणार आहे. आई गमावलेल्या 11 वर्षीय मुलीला मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने 1.1 कोटी रुपयांची भरपाई दिली आहे. ही नकसान भरपाई ट्रेलरचे मालक विद्याधर मिश्रा आणि विमा कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना द्यावी लागेल.

नुकसान भरपाईबाबतचा हा दावा अल्पवयीन मुलगी रितिकाचे वडील अशोकन कनपथी आणि आजोबा आनंद सुबय्या राय यांनी दाखल केला होता. मात्र, त्यादरम्यान त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर रितीकाचा सांभाळ तिची आजी भानुमती आनंदराज यांनी केला. या नुकसान भरपाईच्या दाव्यासाठी ती एकमेव हक्कदार होती. तिने आजीमार्फत न्यायाधिरणात दावा दाखल केला होता. न्यायाधिकरणाने सांगितले की, नुकसान भरपाईची गणना करताना अनेक पैलूंचा विचार करणे आवश्यक आहे.

मुलीची आई सीता अशोकन (वय 37) शाळेत शिक्षिका होत्या. तसेच त्या शिकवणीही घेत होत्या. मृत्यूच्या वेळी त्यांचे मासिक उत्पन्न 60,000 रुपये होते. त्यांचे वय लक्षात घेता, त्या दीर्घकाळ कामकाज करता आले असते आणि चांगला आर्थिक मोबदलाही त्यांना मिळाला असता. मात्र, अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि रितीकाचे छत्र हिरावले गेले. या सर्व पैलूंचा विचार करत न्यायाधिकारणाने तिला 1.1 कोटींची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले.

रितीका 21 वर्षांची होईपर्यंत या रकमेचा एक मोठा भाग मुदत ठेवीमध्ये ठेवला जाईल. तर 2015 पासून व्याजासह सुमारे 5.50 लाख रुपये तिच्या संगोपनासाठी, सांभासासाठी आणि तिच्या खर्चासाठी तिच्या आजीला दिले जातील. रितीका सध्या तिच्या वृद्ध आजीकडे राहते, त्यांच्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही. त्यामुळे तिच्या शैक्षणिक आणि दैनंदिन खर्चासाठी पैशांची गरज असल्याचे रितिकाच्या वकिलांनी सांगितले. तसेच वकिलाने विनंती केली की, संपूर्ण रक्कम मुदत ठेवीमध्ये जमा करण्याऐवजी तिच्या पालनपोषणासाठी काही भरपाई द्यावी. ही भरपाई ट्रेलरचे मालक विद्याधर मिश्रा आणि विमा कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना द्यावी लागेल. हा अपघात 11 मे 2015 रोजी दुपारी झाला होता. रितीकाची आई स्कूटीने जात होती. माझगावला आल्यावर भरधाव ट्रेलरने स्कूटीला धडक दिली. या अपघातात रितीकाच्या आईचा मृत्यू झाला होता.