भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड; प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या ‘टेंडर’बाज मंत्र्यांचा प्रताप; विरोधक आक्रमक

नियमबाह्य काम करत नाहीत म्हणून निलंबनाची कारवाई झालेल्या आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पोलखोल केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र लिहिले आहे. यावरून आता राज्यातील राजकारण तापले असून विरोधकांनी शिंदे-भाजपा सरकारला घेरले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

महायुती सरकारमध्ये फक्त टेंडर काढण्याची स्पर्धा असते. जे भ्रष्ट अधिकारी मंत्र्यांच्या आदेशाने नियमबाह्य काम करतात त्यांचे पूर्ण लाड पुरवले जातात. जे नियमबाह्य काम करत नाही त्यांचा महायुतीतील मुजोर आणि भ्रष्ट मंत्री कसा छळ करतात त्याचा मोठा पुरावा समोर आला आहे, असे ट्विट विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

ते ट्विटमध्ये पुढे म्हणातात, पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ.भगवान पवार यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निलंबन मागे घ्यावे म्हणून पत्र लिहिले आहे. मंत्र्यांनी त्यांना बोलवून वारंवार नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकला, ते काम केले नाही म्हणून निलंबनाची कारवाई केली गेली याबाबत अनेक खुलासे करून मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आरोग्य खाते हे लोकांच्या आयुष्याशी निगडित आहे, अँब्युलन्स घोटाळा पासून अनेक विषयांवर आम्ही सरकारकडे जाब विचारला पण सरकार तिथे कारवाई करत नाही. प्रामाणिक अधिकारी या भ्रष्ट सरकारचा खरा चेहरा जाणते समोर आणत आहेत. या पत्राची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांच्या टेंडर साठी प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी देऊ नये, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

तीस वर्ष प्रामाणिक सेवा देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर स्वतःच्या न्यायासाठी पत्र लिहायची वेळ यावी ही घटना साक्ष देणारी आहे की राज्यात भ्रष्टाचारी सरकार आणि मंत्र्यांनी पापाचा कळस गाठला आहे, असा घणाघाती आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

रोहित पवारांनीही साधला निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही याच मुद्द्यावर ट्विट करत सरकारला धारेवर धरले आहे. आरोग्य विभागात ॲम्ब्युलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या ‘खेकड्या’ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केलीय. नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडं केलीय. नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे साहेब आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार? असा खडा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.