पॅण्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल पेटला; युवक जखमी

पॅण्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलने अचानक पेट घेतल्याने युवक जखमी झाल्याची घटना शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे सोमवारी सकाळी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.दत्तात्रय दामोदर वैद्य (वय 47 ) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकानचालक दत्तात्रय वैद्य हे सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकानात बसले होते. यावेळी त्यांना आजूबाजूला धूर दिसू लागला. यावेळी त्यांना पॅण्टच्या खिशातून धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने खिशातील मोबाईल बाहेर काढला. तोपर्यंत त्यांच्या पॅण्टने पेट घेतला होता. तसेच त्यांच्या हाताला व मांडीलादेखील भाजले होते. खिशातील मोबाईल हातात घेताच त्याने पेट घेतला. त्यांनी मोबाईल खाली फेकून देताच तो जळून खाक झाला, असे दत्तात्रय वैद्य यांनी सांगितले. दत्तात्रय वैद्य यांनी पाच वर्षांपूर्वी ‘एमआय’ कंपनीचा ‘रेडमी सेव्हन’ हा मोबाईल खरेदी केला होता. कोणत्या कारणातून मोबाईलचा स्फोट झाला, हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही. वैद्य यांनी सतर्कता दाखवीत मोबाईल दूर फेकल्यामुळे मोठा अनर्थ टळला.