मुंबई-हैदराबाद आज भिडणार

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का बसलेला मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आपल्या विजयाचे खाते उघडण्यासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघांना अटीतटीच्या पहिल्या सामन्यात हार सहन करावी लागली होती. दोन्ही विजयाचे भुकेले असले तरी घरच्या मैदानावर हैदराबादचे पारडे जड मानले जात आहे.

यंदाच्या मोसमात हैदराबादचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सबरोबर झाला होता. या सामन्यात कोलकात्याने अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला होता. हैदराबादचा हेन्रीक क्लासेनने 29 चेंडूंत 8 षटकार खेचत 63 धांवांची तुफानी खेळी केली होती, मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देण्यात अपुरी पडली. गोलंदाजीमध्ये टी. नटराजन आणि मयांक मार्कंडेय यांनी चमक दाखवली होती, तर दुसरीकडे मुंबईला गुजरातने घरच्याच मैदानावर अवघ्या 6 धावांनी पराभवाची धूळ चारली होती.

उद्या हैदराबाद येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर मुंबई आणि हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असल्याने उद्याच्या सामन्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल यात शंका नाही. उद्याच्या सामन्यात रोहित शर्मा, इशान किशन, हार्दिक पंडय़ा यांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.