कॉर्पोरेट चषकावर मुंबई पोलिसांचे नाव; मध्य रेल्वेची उपांत्य फेरीत धडक

अंतिम फेरीत जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड स्पोर्ट्स क्लबचा 9 विकेट राखून पराभव करत मुंबई पोलीस स्पोर्ट्स क्लब ‘बी’ संघाने एमसीए कॉर्पोरेट चषकाच्या ‘सी’ डिव्हिजनचे जेतेपद पटकावले.

मरीन ड्राइव्ह येथे गुरुवारी खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करणाऱया जेएसडब्ल्यू स्टीलचा डाव 17.5 षटकात केवळ 88 धावांवर आटोपला. डावखुरा फिरकीपटू अनुज गिरी आणि लेगस्पिनर स्वप्नील कुळ्ये यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखले.

त्यानंतर मुंबई पोलिसांनी माफक विजयी लक्ष्य 15 षटकांत एका विकेटच्या बदल्यात पार केले. यश रामचंदानी नाबाद 40 धावा (39 चेंडू, 5 चौकार) आणि तन्मय मयेकरने (29 धावा) दमदार 63 धावांची सलामी रचताना मोठय़ा विजयाची पायाभरणी केली. मुंबई पोलिसांचा डावखुरा फिरकीपटू अनुज गिरीला अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक ः ‘सी’ डिव्हिजन (अंतिम फेरी)ः जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड एससी – 17.5 षटकांत सर्वबाद 88 (मोहित तमेचेकर 33; अनुज गिरी 2/29, स्वप्नील कुळये 2/28) वि. ग्रेटर मुंबई पोलीस स्पोर्ट्स क्लब ‘बी’ – 15 षटकांत 1 बाद 90 (यश रामचंदानी 40 * (39 चेंडू, 5 चौकार).