पत्नीसाठी विमानात बॉम्ब असल्याची दिली धमकी, पोलिसांनी केली अटक

पत्नीला विमानतळावर पोहोचण्यास उशीर होत असल्याने ते विमानच उशीरा करण्यासाठी नवऱ्याने विमानात बॉम्ब असल्याची धमकी दिली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. मात्र मुंबई पोलिसांनी या धमकी देणाऱ्याचा शोध घेऊन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मालाड येथीस एअरलाईन्सच्या कॉल सेंटरवर एक धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्याने दावा केला की, मुंबईहून बंगळुरुला जाणाऱ्या 6.40च्या फ्लाईट क्र.QP 1376 मध्ये बॉम्ब आहे. 167 प्रवाशांना घेऊन फ्लाईट टेक ऑफ करण्याच्या तयारीत असताना एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आलेल्या धमकीच्या फोनबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. कॅप्टनने हवाई वाहतूक नियंत्रणला याची माहिती दिली. हवाई अड्डा पोलीस , स्थानीय अपराध शाखा , दहशतवाद विरोधी पथक आणि बॉम्ब निकामी पथकाच्या अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षित बाहेर काढले आणि विमान आणि प्रवाशांच्या सामानांची कसून चौकशी केली. पण त्यांना कुठलीच संशयास्पद वस्तू सापडली नाही आणि धमकीचा फोन खोटा ठरला. अखेर बऱ्याच वेळानंतर मध्यरात्री विमान बंगळुरुला रवाना झाले.

या घटनेनंतर एअरलाईन्सकडून नाइलेश घोंगडे याने विमानतळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. निरीक्षक मनोज माने, उपनिरीक्षक स्वप्नील दळवी यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान, माने, दळवी आणि त्यांच्या टीमने धमकी देण्यासाठी वापरलेला मोबाइल नंबर ट्रेस केला, ज्यामुळे ते बेंगळुरू येथील विलास बडे यांच्याकडे गेले. बडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने फोन केल्याची कबुली दिली. बेंगळुरूमधील एका खाजगी कंपनीत काम करणारे बडे म्हणाले की त्यांची पत्नी इंटिरियर डिझायनर आहे. कामानिमित्त एका ग्राहकाला भेटण्यासाठी ती मुंबईला गेली होती. तिथून तिला बंगळुरुला परतायचे होते. मात्र तिला विमानतळावर पोहोचायला उशीर झाला. तिने त्याबाबत पती विलास यांना सांगितले. ती वेळेत विमानतळावर पोहोचू शकणार नाही हे कळल्यावर विलास याला कल्पना सुचली आणि त्याने विमानाला बॉ़म्बने उडविण्याची धमकी दिली. त्याने फोन करुन विमानात बॉम्ब असल्याचे सांगितले. विमान टेक ऑफ होऊ नये म्हणून त्याने हे सांगितले. पण असे करणे त्याला महागात पडले. विलास बडे याला शनिवारी अटक करण्यात आली. त्यानंतर दोन दिवस कोठडीत ठेवल्यानंतर मंगळवारी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

दुसरीकडे विमानाला उशीर होऊनही विमान कंपनीने विलास बडे यांच्या पत्नीला विमानात बसू दिले नाही. मात्र, त्यांना दुसऱ्या विमानात बसवण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. या प्रकारामुळे विलास बडे यांच्यावर आता फौजदारी खटला सुरू असून, त्यात दोषी आढळल्यास त्यांना कमाल सात वर्षांची शिक्षा होऊ शकते.