नांदेड ते हैदराबाद आणि नांदेड ते अहमदाबाद विमानसेवा 31 मार्चपासून सुरू होणार

नांदेड-पुणे विमानसेवेची चर्चा सुरु असताना आता या विमानसेवेला पुणे विमानतळावर स्लॉट मिळत नसल्याने तुर्त ही विमानसेवा लांबणीवर पडली आहे. तरी आता नांदेडकरांसाठी बहुप्रतिक्षीत असलेल्या नांदेड-हैद्राबाद आणि नांदेड – अहमदाबाद विमानसेवेला लवकरच सुरुवात होणार असूनही येत्या 31 मार्चपासून ही विमानसेवा नियमितपणे सुरू होणार आहे.

नांदेड ते पुणे ही विमानसेवा 22 मार्चपासून सुरु होणार अशा बातम्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असताना पुणे विमानतळावर स्लॉट मिळत नसल्याने ही विमानसेवा लांबणीवर पडली आहे. आता अहमदाबाद-नांदेड ही विमानसेवा प्रत्येक आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी सुरू होणार आहे. शिवाय याच वेळी प्रत्येक आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार, रविवारी हैदराबाद -नांदेड ही विमानसेवा सुरू होणार आहे. हैदराबाद येथून सकाळी 7.55 वाजता उडाण घेणारे विमान नांदेड येथे सकाळी 8.45 मिनिटांनी पोहचेल तर परतीच्या प्रवासात नांदेड येथून दुपारी चार वाजून 30 मिनिटाला उडाण घेणारे विमान हैदराबाद येथे सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटाला पोहोचेल, अशी माहिती देण्यात आली आहे . या शिवाय बंगळुरु -नांदेड- दिल्ली, दिल्ली-जालिंदर ही विमानसेवाही सुरू होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र याचे वेळापत्रक अद्यापपर्यंत प्रसिध्द करण्यात आले नाही.

नांदेड ते पुणे ही विमानसेवा मात्र अडगळीत पडली असून, ती कधी सुरु होणार हे मात्र अनिश्चित आहे. 2017 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील 22 विमान तळावरुन विमानसेवा सुरु होणार अशी घोषणा करुन त्याचे उद्घाटनही केले. मात्र नांदेडची अमृतसर सेवा तसेच नांदेड-हैदराबाद-मुंबई ही विमानसेवा वर्षभरातच बंद पडली होती. आता नव्याने अहमदाबाद व हैद्राबाद ही विमानसेवा सुरु होणार असल्याने नांदेडकरांचा प्रवास जलद होणार आहे.