लडाखची लढाई इंडियाने जिंकली; भाजपचा धुव्वा

कारगीलच्या लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सला घवघवीत यश मिळाले. तर भाजपचे अक्षरशः पानिपत झाले. काऊन्सिलच्या 30 जागांपैकी 26 जागांसाठी 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक झाली होती. आज झालेल्या मतमोजणीत ‘इंडिया’ आघाडीतील नॅशनल कॉन्फरन्सला @12 जागा तर काँग्रेसला 10 जागांवर विजय मिळाला. भाजपला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली.

कलम 370 रद्द झाल्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-कश्मीरपासून वेगळा झाल्यानंतर केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर लडाखमध्ये कारगीलमध्ये पहिली स्थानिक निवडणूक झाली. नवीन काऊन्सिल 11 ऑक्टोबर रोजी गठीत होणार आहे. 25 अपक्ष उमेदवारांसह एकूण 85 उमेदवार रिंगणात होते. एकूण 77.62 टक्के मतदान झाले. नॅशनल कॉन्फरन्सचे 17 उमेदवार तर काँग्रेसचे 22 उमेदवार मैदानात होते. कारगील हा नॅशनल कॉन्फरन्सचा गड राहिला असून काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहिला आहे.