भाजपच्या राज्यात संसद, समाज काहीही सुरक्षित नाही; प्रियांका गांधी यांचा हल्लाबोल

संसदेत झालेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही सभागृहात याबाबत निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या मागणीवरून संसदेत झालेल्या गोंधळाप्रकरणी विरोधी पक्षातील 146 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यावरून विरोधी पक्ष आक्रमक होत केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहे. यातच आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मणिपूरमधील एका घटनेचा उल्लेख करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी टीव्हीवर बोलतात, रेडिओवर बोलतात, पण सभागृहात बोलत नाही. संसदेतील घुसखोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावे, हीच आमची मागणी आहे, असे सांगत मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रावर टीका केली. यानंतर प्रियंका गांधी यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत लिहिलेल्या पोस्टमधून त्यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे.

प्रियंका गांधी यांनी मणिपूरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये या हिंसाचारात बळी पडलेल्यांवर नातेवाईक अंत्यसंस्कार करताना दिसत आहेत. जरा विचार करा की, मणिपूर हिंसाचारात मारल्या गेलेल्या लोकांवर आठ महिन्यांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. मणिपूरबाबत संसदेत प्रश्न विचारला असता, सरकारने जबाबदारी घेण्याऐवजी विसंगत उत्तरे दिली. आता खुद्द पंतप्रधान ज्या संसदेत बसतात ती संसदही सुरक्षित नाही, तर सुमारे दीडशे खासदारांना प्रश्न विचारल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. भाजपच्या राजवटीत संसद, सीमाभाग, रस्ते, समाज काहीही सुरक्षित नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.