प्रदूषणाच्या नावावर उद्योगांची फसवणूक करण्याचे प्रकार उघडकीस; बोगस शासकीय अधिकाऱयांचे प्रताप

राज्य सरकारी अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक करण्याचे प्रकार शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात वाढले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उद्योग-व्यवसायांपासून बिल्डरांच्या प्रकल्पांवर खोटय़ा नोटीस लावून पैसे वसुलीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न या प्रकारामुळे ऐरणीवर आला आहे.

राज्यात मध्यंतरी प्रदूषणाचे प्रमाण वाढले होते. प्रदूषणकारी प्रकल्प बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जारी झाल्या होत्या. या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन बोगस सरकारी अधिकारी तयार झाले आहेत. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असल्याचे सांगत पैसे वसुली करण्याचे रॅकेट उघडकीस आले आहेत. प्रदूषण नियंत्रण नियंत्रण मंडळाचे अधिकारी- कर्मचारी असल्याचे सांगत तोतया अधिकारी उद्योग-आस्थापना तसेच हॉस्पिटल आणि बांधकाम प्रकल्पात थेट प्रवेश करतात. प्रदूषण नियमांचा भंग झाला आहे. तुमच्या प्रकल्पातून मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचे सांगत थेट नोटीस चिकटतात. प्रदूषण नियंत्रण मंडळातून बोलत असल्याचे सांगत थेट पह्नही केले जात आहेत. अशा या तोतया अधिकाऱयांकडून उद्योग- व्यवसाय आणि बिल्डरांकडून पैसे वसूल केले जात असल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेक बिल्डरांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऑफिसमध्ये धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने अखेर सार्वजनिक नोटीस जाहीर केली करून उद्योग-व्यवसायांना सावध केले आहे.