एनसीबीच्या जप्तीवर संशय, हायकोर्टात फौजदारी याचिका

गेल्या वर्षी अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) जप्त केलेल्या अमली पदार्थावर संशय घेणारी फौजदारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश एनसीबीला दिले आहेत.

तारकानंद त्रिवेदी यांनी ही याचिका केली आहे. या याचिकेत एनसीबीचे महासंचालक, पेंद्र व राज्य शासन यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्या. रेवती मोहिते-ढेरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. पुढील सुनावणी 11 जून 2024 रोजी होणार आहे.

काय आहे प्रकरण

जप्ती करताना एनसीबीचे प्रमुख प्रत्यक्ष घटनास्थळी हजर हवेत. मुद्देमालाची तपासणी, त्याचे वजन करायला हवे. मात्र गेल्या वर्षी एनसीबीने लखनऊ, दिल्ली, इंदूर आणि जम्मूकश्मीर येथे एकाच वेळी अमलीपदार्थ जप्त केले. त्या वेळी एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांच्यासमोर जप्ती झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात ते घटनास्थळी नव्हते. त्यामुळे याची सीबीआयकडून चौकशी करावी, अशी मागणी त्रिवेदी यांनी याचिकेत केली आहे.