हिंदुस्थानचे पुढचे लक्ष्य ठरले…चांद्रयान – 4; एस. सोमनाथ यांनी दिली महत्त्वाची माहिती

हिंदुस्थानने चांद्रयान -3 यशस्वी करत अंतराळ क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. या यशस्वी मोहिमेनंतर आदित्य एल 1 ही सूर्याची माहिती मिळवण्याची मोहिमही यशस्वी होत आहे. आता हिंदुस्थानने आपले पुढचे लक्ष्य निर्धारीत केले असून इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. इस्रो चांद्रयान -4 मोहिमेवर काम करत असून 2024 पर्यंत हिंदुस्थानी व्यक्ती चंद्रावर उतरवण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सोमनाथ यांनी दिली. पंजाबमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

अंतराळ संशोधन ही सातत्याने सुरू असणारी प्रक्रिया आहे. देश झपाट्याने या क्षेत्रात प्रगती करत आहे. आता आम्ही चांद्रयान 4 मोहिमेवर काम करत आहोत. या मोहिमेद्वारे 2040 पर्यंत चंद्रावर हिंदुस्थानी व्यक्तीला उतरवण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्यासाठी इस्रो तयारी करत आहे. या मोहिमेसाठी चंद्राबाबत अधिक माहिती मिळवत यश मिळवण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेद्वारे चंद्रावरील माती आणि धातूनचे नमुने मिळवून ते आणून अधिक संशोधन करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या चांद्रयान 4 मोहिमेनंतर चंद्राबाबत अधिक माहिती मिळणार असून संशोधनाला नवी दिशा मिळेल, असेही सोमनाथ यांनी सांगितले.

हिंदुस्थानने 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 मिशन लाँच केले होते. 23 ऑगस्टला चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले होते. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उथरणार हिंदुस्थान हा पहिला देश ठरला होता. या मोहिमेने अंतराळ क्षेत्रात हिंदुस्थानची मोहर उमटवली. या यशस्वी मोहिमेनंतर इस्रोच्या एस. सोमनाथ यांनी पुढील महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती दिली आहे.