पंडित नेहरुंच्या चुकांमुळे POK चा जन्म झाला; अमित शहा यांची टीका, विरोधकांचा सभात्याग

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार राजकीय खडाजंगी होण्याची शक्यता होती. त्याचप्रमाणेच संसदेत बुधवारी खडाजंगी बघायला मिळाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंबाबत केलेल्या विधानामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला. या विधानाचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला.

लोकसभेत जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यासंदर्भात अमित शाह निवेदन करत होते. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने तिथे कोणती विकासकामे केली, असा सवाल सातत्याने उपस्थित केला जातो. त्यावर उत्तर देताना अमित शाह यांनी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून झालेल्या दोन चुकांमुळे पाकव्याप्त कश्मीरची निर्मिती झाली आणि काश्मीरला पुढची अनेक वर्षं अन्याय, अत्याचार सहन करावे लागले, असे शहा म्हणाले.

अमित शाह यांनी आपल्या भाषणात हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाचा संदर्भ दिला. पंडित जवाहरलाल नेहरूंची पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे जेव्हा आपलं सैन्य जिंकत होते, तेव्हा पंजाबचा भाग येताच त्यांनी युद्धबंदी केली. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला. युद्धबंदी तीन दिवस उशीरा झाली असती, तर आज पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानचा भाग असता, असा दावा अमित शाह यांनी यावेळी केला. अमित शाहा यांच्या या दाव्यावरून काँग्रेस खासदारांनी आक्रमक होत आरडाओरड करायला सुरुवात केली.

नेहरूंची दुसरी चूक म्हणजे संयुक्त राष्ट्रात हिंदुस्थान-पाकिस्तान वादाचा मुद्दा नेणे ही होती. हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांत नेणे, ही घोडचूक ठरली, असे शहा म्हणाले. विरोधक विनाकारण माझ्यावर चिडचिड करत आहेत. मी नेहरूंचं पत्र वाचून दाखवत आहे. त्यांना चिडचिड करायचीच असेल, तर त्यांनी नेहरूंवर करायला पाहिजे, असेही अमित शाह म्हणाले. शहा यांच्या या वक्तव्यांचा निषेध करत विरोधी पक्षांनी सभात्याग केला.