आपने लोकसभेसाठी नारळ फोडला; गुजरातमधून जाहीर केला उमेदवार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहे. आपने यात आघाडी घेतली आहे. दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातमधील भरुच मतदारसंघातून आपला उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाचे आमदार चैत्रा वसावा यांना आपने भरुच लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

गुजरातमधील नेत्रंग येथे एका सभेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, आज मी जाहीर करतोय की, चैत्र वसावा आम आदमी पार्टीच्या वतीने भरुच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. वसावा यांना जामीन मिळाला नाही, तर ते तुरुंगातून लोकसभेची निवडणूक लढवतील. गुजरातमधील डेडियापाडा येथील आप आमदार चैत्रा वसावा वन विभागाशी संबंधित एका प्रकरणात तुरुंगात आहेत.

यावेळी भाजपवर टीका करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, आदिवासी समाजाचे नेते चैत्रा वसावा यांना भाजपच्या सांगण्यावरुन अटक केली. ते मला धाकट्या भावासारखे आहेत. सर्वात दुःखाची बाब म्हणजे वसावा यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली. ही संपूर्ण आदिवासी समाजाचा अवमान करणारी बाब आहे. डाकूंचाही धर्म होता, पण भाजपवाले त्या डाकूंपेक्षाही वाईट आहेत. चैत्र वसावा वाघ आहेत, त्यांना फार काळ पिंजऱ्यात ठेवता येत नाही, असेही केजरीवाल म्हणाले. चैत्राभाई दामजीभाई वसावा डेडियापाडा विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार आहेत. जानेवारी 2023 मध्ये त्यांची गुजरात विधानसभेत आपचे विधिमंडळ पक्ष नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा येथे कथित खंडणी आणि वन अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी वसावा तुरुंगात आहेत.