अदानींच्या ताब्यानंतर नवी मुंबई विमानतळाचे बजेट 26 हजार कोटींनी फुगले, 16 हजार कोटींचा प्रकल्प थेट 41 हजार कोटींवर

>> बाळासाहेब दारकुंडे 

सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचा ताबा जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाकडे आल्यानंतर या विमानतळाचे बजेट बेडकीसारखे फुगले आहे. जीव्हीके कंपनी हे विमानतळ 16 हजार 700 कोटी रुपयांमध्ये उभारणार होती. मात्र अदानी समूहाने या खर्चात तब्बल 24 हजार 600 कोटींची वाढ करून तो थेट 41 हजार 302 कोटी रुपयांवर नेला आहे. या विमानतळाचे एकूण पाच टप्पे असून डिसेंबर 2024मध्ये पूर्ण होणाऱया पहिल्या आणि दुसऱया टप्प्यावरच 19 हजार 646 कोटी खर्च होणार आहेत. तसा अहवालच अदानी समूहाच्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीने पर्यावरण मंत्रालयाला पाठवला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती सार्वजनिक-खासगी भागीदारी या तत्त्वावर केली जात आहे. 24 ऑक्टोबर 2017 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानतळाचे काम जीव्हीके कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी संपूर्ण विमानतळ उभारणीचा खर्च 16 हजार 700 कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला होता. जागेच्या सपाटीकरणाची आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सिडकोवर टाकण्यात आली होती. विमानतळाच्या क्षेत्रातील टेकडय़ा हटवणे, नदीचा प्रवाह वळवणे, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या कामासाठी सिडकोने एक हजार 800 कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले होते.

पहिल्या टप्प्यातच 19 हजार 646 कोटी खर्च

आतापर्यंत अदानी समूहाने 57 टक्के काम पूर्ण केले आहे. सिडकोच्या पूर्वीच्या नियोजनानुसार संपूर्ण विमानतळ 16 हजार 700 कोटी रुपयांमध्ये उभे राहणार होते. मात्र अदानी समूहाने पहिल्या आणि दुसऱया टप्प्यातील कामाचा खर्चच थेट 19 हजार 646 कोटी रुपयांच्या घरात नेला आहे.

जीव्हीके अचानक आर्थिक डबघाईला

18 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे भूमिपूजन झाले. मात्र त्यानंतर दोन वर्षांत आश्चर्यकारकरीत्या जीव्हीके कंपनीने आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे जाहीर केले. त्यानंतर या कंपनीने विमानतळ निर्मितीचे अधिकार अदानी समूहाकडे हस्तांतरीत केले. भूमिपूजन झाले त्या वेळी विमानतळ उभारणीच्या खर्चाचे बजेट 16 हजार 700 कोटी रुपये इतके होते. मात्र आता खर्चाच्या विमानाने मोठे उड्डाण केले.

2024ची डेडलाईन पाळणार का?

अदानी समूहाने आता डिसेंबर 2024 ही डेडलाईन दिली आहे. मात्र आतापर्यंत विमानतळाचे काम अवघे 57 टक्के इतकेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे अदानी डिसेंबर 2024ची डेडलाईन पाळणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

नऊ कोटी प्रवाशांची क्षमता

पाचवा फेज पूर्ण झाल्यानंतर विमानतळाची क्षमता प्रत्येक वर्षाला सुमारे नऊ कोटी प्रवाशी हाताळण्याची होणार आहे. नवी मुंबई विमानतळ पूर्ण क्षमतेने 2035पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.