मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणाऱ्या ‘स्वाभिमानी’च्या नऊ कार्यकर्त्यांना अटक; पोलीस कोठडीतच अन्नत्याग आंदोलन करणार

मागील गळीत हंगामातील उसाचा थकीत 100 रुपयांचा हप्ता तातडीने द्यावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल वडगाव-हातकणंगले रस्त्यावर काळे झेंडे दाखविणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नऊ कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्री अटक केली. त्यांना आज वडगाव न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

मुख्यमंत्री शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत, याचा निषेध म्हणून बंडू पाटील, विश्वास बालिघाटे, स्वस्तिक पाटील, अक्षय देसाई, राजू गिड्ड, सुनील खोत, दीपक चौगुले, महावीर चौगुले, श्रीकांत करके हे नऊ कार्यकर्ते उद्यापासून (दि. 10) पोलीस कोठडीतच अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगण्यात आले.

मागील गळीत हंगामातील थकीत बिलापोटी 400 रुपये द्यावे, या मागणीसाठी 23 नोव्हेंबर 2023 रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मध्यस्थी करून मागील गळीत हंगामातील 100 रुपये देण्याचे जाहीर केले होते. ही रक्कम दोन महिन्यांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे लेखी आश्वासन साखर कारखान्यांनी दिले होते. मात्र, अद्यापि हे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनलेली आहे. याबाबत तीन वेळा मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. मुख्य सचिव यांच्याकडे आठ साखर कारखान्यांनी प्रस्ताव सादर केला आहे; पण त्याला अजूनही सरकारने मंजुरी दिलेली नाही. यासाठी काल मुख्यमंत्री शिंदे यांना हातकणंगले-वडगाव रस्त्यावर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून संताप व्यक्त केला होता.