माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत!; अर्थमंत्री सीतारामन यांचे अजब विधान

इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून तब्बल 6 हजार कोटींहून अधिक देणग्या घेऊन तुंबडय़ा भरणाऱया भाजपच्याच नेत्या आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निवडणूक लढण्यासाठी पैसे नसल्याचे म्हटले आहे. हे कारण देत त्यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे.

नड्डा यांनी तामीळनाडू किंवा आंध्र प्रदेशातून लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यास माझी हरकत नाही, पण निवडणूक लढवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत, असे त्यांनी नड्डा यांना सांगितले. टाईम्स नाऊ समिटमध्ये त्या बोलत होत्या. तुम्ही तर देशाच्या अर्थमंत्री आहात आणि तुम्हीच म्हणत आहात की माझ्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत, असे विचारले असता देशाचा निधी हा माझा नाही. माझा पगार, सेव्हिंग माझी आहे, असे उत्तर सीतारामन यांनी दिले.

जिंकण्यासाठीचे भाजपचे निकष मान्य नाहीत!
लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचे जे निकष आहेत तेदेखील मान्य नसल्याचे नड्डा यांना सांगितल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. तुम्ही अमक्या जातीचे आहात किंवा तमक्या धर्माचे आहात, असे निकष निवडणूक जिंकण्यासाठी लावले जातात. त्याआधारे उमेदवारी दिली जाते. परंतु, हे निकषच मान्य नाहीत, सीतारामन म्हणाल्या.