लकव्याचा रुग्ण मेंदूतील चिपमुळे खेळला बुद्धिबळ

हातांचा वापर न करता केवळ विचाराने बुद्धिबळ खेळायचे…  काय खरे वाटत नाही ना…पण हे वास्तवात करून दाखवलेय इलन मस्क यांच्या ‘न्यूरालिंक’ या ब्रेन-चिप स्टार्टअपने. ‘न्यूरालिंक’च्या पहिल्या रुग्णाने केवळ विचारांनी ऑनलाईन बुद्धिबळ आणि व्हिडीओ गेम खेळू शकतो हे दाखवून दिले आहे. अर्धांगवायू झालेल्या या रुग्णाचा व्हिडीओ आज इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर सारी दुनिया अवाक झाली आहे. व्हिडीओमध्ये रुग्णाने स्वतःची ओळख 29 वर्षीय नोलँड अर्बाग म्हणून दिली आहे. त्याचा अपघात झाला होता. त्यानंतर त्याला खांद्याच्या खाली अर्धांगवायू झाला होता. तो लॅपटॉपवर बुद्धिबळ खेळताना आणि न्यूरालिंक उपकरण वापरून कर्सर हलवताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. लाईव्ह व्हिडीओमध्ये, मी हे करू शकत आहे, याचा मला खूप आनंद होत आहे, असे नोलँड अर्बाग म्हणतोय.

न्यूरालिंक म्हणजे काय

एलन मस्कने 2016 मध्ये स्थापन केलेले न्यूरालिंक हे ब्रेन-चिप स्टार्टअप आहे. हे एक उपकरण आहे. ते नाण्याच्या आकाराचे असून त्याचे मानवाच्या कवटीत शस्त्रक्रियेने रोपण केले जाते. त्याच्या अतिपातळ तारा मेंदूमध्ये जातात आणि मेंदू-संगणक इंटरफेस विकसित करतात.  हे  स्मार्ट पह्नला ही कनेक्ट करता येते.

n फेब्रुवारीमध्ये स्टार्टअपचे संस्थापक मस्क म्हणाले होते की, न्यूरालिंकची ब्रेन-चिप प्रत्यारोपित केलेला पहिला मानवी रुग्ण पूर्णपणे बरा झालेला दिसतोय. त्याच्या विचारांचा वापर करून संगणक माऊस नियंत्रित करण्यात तो सक्षम होता. यामध्ये कोणतेही दुष्परिणाम नाहीत. न्यूरालिंक रुग्णाकडून जास्तीत जास्त माऊस बटण क्लिक मिळविण्याचा प्रयत्नात आहे.