तिरूपती बालाजीकडून श्री अंबाबाईला शालू अर्पण

विजयादशमी दसऱ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही तिरुपती बालाजी देवस्थान समितीकडून नारंगी रंग, सोनेरी जरीकाठ आणि बुट्टय़ांचा सुंदर असा भरजरी व मानाचा शालू आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला अर्पण करण्यात आला.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात आज सकाळी दहाच्या सुमारास तिरुपती देवस्थानचे सदस्य व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर तसेच राजेशकुमार शर्मा यांनी श्री अंबाबाईला हा मानाचा शालू अर्पण केला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सचिव सुशांत बनसोडे यांनी या शालूचा स्वीकार केला. यावेळी तिरुपती देवस्थानचे समन्वयक के. रामाराव आदी उपस्थित होते. तिरुमला-तिरुपती देवस्थानच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सवात आदिशक्ती आणि देशातील 51 शक्तिपीठांतील देवता असलेल्या श्री अंबाबाईला आईच्या भावनेतून शालू अर्पण करण्यात येतो. विजयादशमीला हा शालू देवीला परिधान केला जातो.

लाखमोलाचा भरजरी शालू

तिरुमला-तिरुपती देवस्थानकडून आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईला अर्पण करण्यात आलेल्या शालूची किंमत 1 लाख 6 हजार 575 इतकी आहे. या शालूसह मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडील ओटीही श्री अंबाबाई चरणी अर्पण केली.

दरवर्षीप्रमाणे दसऱ्यानिमित्त यंदाही तिरूपती बालाजी देवस्थान समितीकडून श्री अंबाबाईला शालू अर्पण करण्यात आला. यावेळी तिरुपती देवस्थानचे सदस्य, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर, राजेशकुमार शर्मा, के. रामाराव आदी उपस्थित होते.