विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट, कझाकिस्तानच्या पहेलवानाला दाखवले आसमान

हिंदुस्थानची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे. किर्गिस्तानमधील बिश्केक येथे सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत विनेश फोगट हिने कझाकिस्तानची पहेलवान लॉरा गानिकिझी हिचा 10-0 असा पराभव केला आणि ऑलिम्पिकचा कोटा मिळवला. ऑलिम्पिकमध्ये ती तिसऱ्यांदा देशाचे प्रतिनिधीत्व करेन.

महिलांच्या 50 किलोग्राम वजनी गटामध्ये खेळताना सेमीफायनल लढतीत विनेश फोगट हिने कझाकिस्तानची महिला पहेलवान हिला आसमान दाखवले. कॉमनवेल्थ स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या विनेशने तांत्रिक आधारावर 4.18 मिनिटात विजय मिळवला. आता तिचा पुढील सामना उजबेकिस्तानच्या अक्तेंगे क्यूनिमजेवा हिच्याशी होईल. तिने चिनी तायपेच्या मेंग ह्सुआन हसीह हिचा 4-2 असा पराभव केला आहे.

या स्पर्धेत विनेशने आपला सर्वोत्तम खेळ दाखवला आहे. सेमीफायनल आधी झालेल्या दोन्ही लढतीत तिने एकतर्फी विजय मिळवला होता. पहिल्या लढतीत तिने कोरियाच्या मिरान चेओन हिचा अवघ्या 67 सेकंदात फडशा पाडला होता, तर दुसऱ्या लढतीत कंबोडियाच्या के स्मानांग हिला मात दिली होती. हाच फॉर्म तिने सेमीफायनलमध्येही कायम राखत एकतर्फी विजय मिळवला आणि ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले.

दरम्यान, विनेशने 2019 आणि 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 53 किलो वजनी गटात कांस्यपदक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकण्याची किमया केली आहे. नुकत्याच पतियाळा येथे झालेल्या निवड चाचणीत 50 व्यतिरिक्त विनेशने 53 किलो वजनी गटातही भाग घेतला. 53 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत तिचा पराभव झाला, मात्र 50 किलो वजनी गटात विजय मिळवल्यामुळे विनेशला आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी प्रवेश मिळाला. या संधीचे तिने सोने करत ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले