बाबर आझमकडे पुन्हा नेतृत्व?

वन डे वर्ल्ड कपमधील अपयशानंतर बाबर आझमकडून पाकिस्तानी संघाच्या तिन्ही फॉरमॅटमधून नेतृत्व काढून घेण्यात आले आणि शान मसूद आणि शाहिद आफ्रिदीकडे संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. मात्र या बदलानंतर पाकिस्तानी संघाची कामगिरी खालावत चालल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट मंडळाला या दोघांवरही काडीचाही विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पीसीबीने बाबर आझमकडे नेतृत्व सोपविण्याचा विचार सुरू केला आहे आणि हे परिवर्तन आगामी टी-20 वर्ल्ड कपपूर्वीही प्रत्यक्षात दिसू शकते, असे अंदाज वर्तवले जात आहेत.

पीसीबीने याबाबत बाबरशी संपर्क साधल्याचेही समोर आले आहे, मात्र त्याने आपले वेगळेच रंग दाखवले आहेत. वर्ल्ड कप पराभवानंतर हटवलेल्या बाबरच्या पुन्हा नेतृत्व स्वीकारताना काही अटी असल्याचेही समोर आले आहे. या अटी मान्य झाल्यावरच तो पाकिस्तानी संघाचे कर्णधारपद स्वीकारेल, असेही सूत्रांकडून कळले आहे. मात्र बाबरने कोणत्या अटी पीसीबीपुढे ठेवल्या आहेत, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.