जातीवाचक शिवीगाळ, टपरी हटविणे प्रकरण; छिंदम बंधूंसह चौघांची याचिका फेटाळली

shripad-chhindam

दिल्लीगेट येथील मोक्याची जागा ताब्यात घेण्यासाठी ज्यूस सेंटरमालकाला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून टपरी हटविल्याप्रकरणात आरोपी श्रीकांत आणि श्रीपाद छिंदमसह चार आरोपींची नावे गुन्ह्यातून वगळण्याची विनंती न्यायालयाने फेटाळली आहे. या प्रकरणात चार्जशीट दाखल करून आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश नगरचे तिसरे तदर्थ अतिरिक्त विशेष सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांनी दिले आहेत.

आरोपी छिंदम बंधूंसह इतर आरोपींची ‘असा गुन्हा घडलाच नसून, आम्हाला या गुन्ह्यातून वगळण्यात यावे,’ असा अर्ज निकाली काढण्यात आला. यामुळे छिंदम बंधूंसह आरोपी महेश सब्बन, राजेंद्र जमदाडेविरुद्ध ‘ऍट्रॉसिटी’ कलमाअंतर्गत दाखल गुन्ह्याचा खटला सुरूच राहणार आहे. यावेळी छिंदम यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद खोडून काढण्यात फिर्यादी भगीरथ बोडखे यांचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ अभिजित पुप्पाल यशस्वी ठरले.

छिंदम बंधूंनी नगरच्या दिल्लीगेट येथील मोक्याची सर्व्हे नंबर 7395/बी/3 ही मिळकत 14 मे 2021 रोजी खरेदी केली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी 9 जुलै 2021 रोजी भाडोत्री गुंड आणि जेसीबी लावून ही जागा बेकायदा ताब्यात घेतली होती. यामध्ये भगीरथ भानुदास बोडखे यांच्या मालकीची ज्यूस सेंटरची टपरी होती. ही टपरी हटविताना बोडखे यांना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. या घटनेवेळी आरोपी छिंदम आणि त्याचे साथीदार घटनास्थळी उपस्थित असल्याचे व्हिडीओ चित्रीकरणाद्वारे समोर आले आहे. तसेच ती जागा जरी छिंदम यांच्या मालकीची असली, तरी आणि ज्यूस सेंटरच्या टपरीचे अतिक्रमण असले, तरी ते हटविण्याबाबत आरोपीकडे कोणताही आदेश नाही, तरीदेखील आरोपींनी बेकायदा टपरी हटविली, असा ज्येष्ठ वकील अभिजित पुप्पाल यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला. त्यामुळे आरोपींनी गुन्ह्यातून वगळण्याचा केलेला अर्ज न्यायालयाने रद्द केला.