लडाखमधील पर्वत विकण्याचा डाव! सोनम वांगचुक यांचा गंभीर आरोप

लडाखमधील हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या दोन आठवड्यांपासून उपोषणावर बसले आहेत. मात्र त्यांच्या या उपोषणाकडे प्रशासनाकडून आणि सरकारकडून दुर्लक्ष सुरू आहे. अशातच आता सोनम वांगचुक यांनी गंभीर आरोप केला की, ‘लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करणे म्हणजे आमचे पर्वत औद्योगिक लॉबी आणि खाण कंपन्यांना विकण्याचा डाव होता’.

एनडीटीव्हीनं वांगचुक यांच्या उपोषणा संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. यावेळी वांगचुक म्हणाले, भाजपने – एकदा नव्हे तर दोनदा – त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले होते. ते त्यांच्या मतदानातील आश्वासनांपैकी एक होते. त्यांनी आम्हाला वचन दिले होते की ते सहाव्या शेड्यूल अंतर्गत लडाखच्या अस्मितेचे रक्षण करतील. परंतु दुर्दैवानं, आश्वासनं पाळली गेली नाहीत. लडाखला लोकशाही प्रतिनिधित्व नाही’, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वांगचुक यांनी असा देखील दावा केला आहे की सैनिकांचे मनोबल देखील खालावल आहे. ‘लडाखमधील सैनिकांचं मनोधैर्य खचलं आहे कारण लडाखमध्ये लोकशाही (विधानसभा) नाही आणि (स्थानिकांसाठी) आरक्षण नाही’, असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

जवळपास पाच वर्षांपूर्वी लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आलं तेव्हा लोकांनी जल्लोष केला होता. पण आता, लडाखमधील लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. मी एवढेच म्हणू शकतो की ते (भाजप) फक्त निवडणुकीचा विचार करतात आणि त्यांना किती जागा मिळतील, परंतु लोकांना विसरून जातात’, अशी भावना देखील त्यांनी बोलून दाखवली.

ते म्हणाले, ‘आम्हाला केंद्राकडून आश्वासन हवे आहे की ते आतापर्यंतची त्यांची आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरले असले तरी ते पुन्हा असे करणार नाहीत’.

मुंबई, पुणे आणि हैदराबादसह देशातील 20 शहरांतील लोक लडाखच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. 20 मार्च आणि पुन्हा 24 मार्च रोजी मोठ्या निषेधाचे नियोजन करण्यात आले आहे.