मोदींचे प्रेम उतू जातंय, सेमी कंडक्टरचे दोन प्रकल्प गुजरातला; महाराष्ट्राचा साधा विचारही नाही

केंद्रातील मोदी सरकारचे गुजरातवरील प्रेम उतू जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज तीन सेमीकंडक्टर चीप प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. त्यातील दोन प्रकल्प गुजरातमध्ये होणार असून तिसरा प्रकल्पही भाजपशासित आसामला देण्यात आला आहे. मोदी सरकारने महाराष्ट्रात येऊ घातलेले हजारो कोटींचे प्रकल्प गुजरातला पळवले असताना व त्यावरून टीकेची झोड उठली असताना नव्या प्रकल्पांत महाराष्ट्राचा साधा विचारही केला गेला नाही.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषदेत प्रकल्पांबाबत माहिती दिली. सेमीकंडक्टर चीप उत्पादक कंपन्यांकडून केंद्र सरकारकडे 2.50 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. त्यातील 1.26 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला सरकारने मान्यता दिली. सेमीकंडक्टर चीप उत्पादनाचे प्रकल्प उभारले जातील. त्यातील 2 प्रकल्प गुजरातमध्ये आणि एक आसाममध्ये उभारला जाणार आहे, असे वैष्णव यांनी सांगितले.

– गुजरातच्या ढोलेरा येथे टाटा ग्रुप आणि तैवानच्या पॉवर चीप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरींग कॉर्पोरेशनच्या जॉईंट व्हेंचरने चीप फॅब्रिकेशन प्रकल्प उभारला जाईल.

– साणंद येथे जपानच्या रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आणि थायलंडच्या स्टार्स मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स यांच्या जॉईंट व्हेंचरने 7600 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

– सेमीकंडक्टर चीपला जगभरात मोठी मागणी आहे. या प्रकल्पांमुळे गुजरातमध्ये हजारो रोजगार निर्माण होणार आहेत.