75 वर्षांनंतरही टीका नेहरूंवरच, अमित शहा यांच्या विधानावरून लोकसभेत गदारोळ

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-कश्मीरात शांतता प्रस्थापित झाली का? दहशतवादी हल्ले कमी का झाले नाहीत? कोणती विकासकामे झाली? याचे उत्तर मोदी सरकार कधी देत नाही. मात्र, 75 वर्षांनंतरही कश्मीर प्रश्नाला पंडित नेहरू जबाबदार असल्याचे एकच तुणतुणे भाजप वाजवत आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा लोकसभेत आला. गृहमंत्री अमित शहा यांनी आज तेच ते आरोप पंडित नेहरूंवर केले. यामुळे सभागृहात गोंधळ झाला. संतप्त विरोधकांनी सभात्याग केला.

जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटविल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन केले. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी पेंद्र सरकारने जम्मू-कश्मीरात कोणती विकासकामे केली? असा सवाल वारंवार केला. याला उत्तर देण्याऐवजी शहा यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दोन चुकांमुळे कश्मीरला अनेक वर्षे अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या, असे सांगितले. यावेळी शहा यांनी ‘हिस्टॉरिक ब्लंडर’ हा शब्दप्रयोग वापरला. यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षाचे खासदार संतप्त झाले.

पंडित नेहरूंची पहिली चूक म्हणजे आपले सैन्य जिंकत होते; पण पंजाबचा भाग येताच त्यांनी युद्धबंदी केली. त्यामुळे पाकव्याप्त कश्मीरचा जन्म झाला. जर युद्धबंदी तीन दिवस उशीरा झाली असती, तर आज पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानचा भाग असता. नेहरूंची दुसरी चूक म्हणजे जम्मू-कश्मीरचा मुद्दा आपला अंतर्गत विषय असताना संयुक्त राष्ट्रसंघात नेण्यात आला. दरम्यान, अमित शहांच्या आरोपांमुळे गदारोळ झाला. काँग्रेससह विरोधकांनी सभात्याग केला.