बटाटा उत्पादन यंदा चाळीस टक्क्यांनी घटणार; अपुऱ्या पावसाचा फटका

यंदा बटाटा उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार हे आता दिसू लागले आहे. एकीकडे पाण्याची अवस्था पाहाता आगामी काळामध्ये त्याचा फटका शेतीला बसणार आहे. अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा मोठा फटका यंदा बटाटा उत्पादनाला बसला आहे. बटाटा उत्पादनात पस्तीस ते चाळीस टक्क्यांची घट झाली असल्याचे बटाटा उत्पादक शेतकरी सांगत आहेत. बटाट्याला मात्र दरवर्षीच्या तुलनेत बाजारात चांगला दर असल्याचे दिसून येत आहे.

नगर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख आहे. आजही अनेक तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट झालेली आहे, तर काही ठिकाणी थोडेफार पाणी शिल्लक असल्यामुळे तेथील पिकांना दिलासा मिळाला आहे. आता उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे शेतीला पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न शेतकऱयांसमोर उभा ठाकला आहे.

राज्यातील नगर, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगलीसह मराठवाडय़ातील अनेक भागांत बटाटय़ाचे उत्पादन घेतले जाते. दुष्काळी आणि अल्प पाण्याचे प्रमाण असलेल्या भागात बटाटा उत्पादनाला शेतकरी प्राधान्य देतात. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लागवड करून फेब्रुवारी, मार्च महिन्यांत बटाटा काढणी होते. नगर जिह्यातील दुष्काळी पट्टा असलेल्या भालगाव (ता. पाथर्डी), राहाता, कोपरगाव भागातील शेतकरी मोठय़ा प्रमाणात बटाटा उत्पादन घेतात. अनेक भागांत बटाटय़ाचे ऊस व अन्य पिकांतही आंतरपीक घेतले जात आहे. दुष्काळी भागतील अनेक शेतकऱयांचे बटाटय़ाच्या पिकांवर अर्थकारण अवलंबून आहे. यंदा पुरेसा पाऊस नव्हता, परतीचा पाऊसही झाला नाही. बटाटय़ाची लागवड झाली; परंतु शेवटच्या टप्प्यात पाणी मिळाले नसल्याने बटाटा पोसण्याला अडसर आल्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. यंदा उत्पादनाला साधारण तीस ते चाळीस टक्के फटका बसल्याचे शेतकरी सांगतात.

बाजारात दर चांगला

उन्हाळ्यातील मागणीचा विचार करता फेब्रुवारी, मार्च महिन्यांत तुलनेने बटाटय़ाचे अधिक उत्पादन घेतले जाते. सध्या बाजारात दररोज प्रत्येक बाजार समितीत दोनशेपासून एक हजार क्विटंलपर्यंत आवक होत आहे. बाजारात प्रतिक्विंटलला सहाशेपासून दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर बरा असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

पाथर्डीतील भालगाव येथे बटाटय़ाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा उपलब्ध पाण्याचे नियोजन करून उत्पादन घेतले. मात्र, पाणीटंचाईचा उत्पादनाला तीस ते चाळीस टक्के फटका बसला आहे.

– गोरक्षनाथ खेडकर, बटाटा उत्पादक शेतकरी, भालगाव, ता. पाथर्डी