पवई तलावाचे रुपडे पालटतेय; पालिकेने सहा हजार मेट्रिक टन जलपर्णी काढली

मुंबईकर-पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेला पवई तलाव स्वच्छ-सुंदर करण्यासाठी तरंगते कारंजे, जैवविविधता आणि जलचरांच्या रक्षणासाठी ऑक्सिजन वाढवणारी एरिएशन ऍण्ड डिसॉल्व्ह ऑक्सिजन मॉनेटरिंग सिस्टीम आणि प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच तलाव जलपर्णीमुक्त करण्यासाठी 8 मार्चपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत 5 हजार 895 मेट्रिक टन जलपर्णी हटवण्यात आली आहे. यामुळे 29 एकर क्षेत्र जलपर्णीमुक्त झाले आहे.

पवई तलाव परिसरात वाढलेले नागरिकरण आणि तलावामध्ये येणारे सांडपाणी यामुळे तलावामध्ये जलपर्णी, इतर अनावश्यक वनस्पतींची वाढ प्रचंड झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी नुकतीच तलावाची पाहणी करून तलाव स्वच्छ-सुंदर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यानुसार पवई तलाव आणि परिसरात जैवविविधता संरक्षणाची विविध कामे सुरू करण्यात आहेत. त्यामध्ये तलावातील जलपर्णी काढणे आणि क्षेपणभूमीवर त्याची विल्हेवाट लावणे, ही एक महत्त्वाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामुळे जलपर्णीव्याप्त क्षेत्रापैकी सुमारे 23 टक्के क्षेत्र जलपर्णीमुक्त झाले असून पवई तलावाची नैसर्गिक समृद्धी वाढीस लागणार असून जैवविविधतेचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

असे होतेय काम

z तलाव जलपर्णीमुक्त करण्यासाठी हार्वेस्टर मशीन, पंटून माऊंटेड पोकलेन आणि पोकलेन, डंपर या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने काम सुरू आहे. पाण्याची गुणवत्ता सुधारली जात आहे.

z तलावाच्या संरक्षण-संवर्धनासाठी तलावात सांडपाणी येण्यापासून रोखणे, त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

z सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प खात्याच्या वतीने कामे हाती घेण्यात येत आहेत. याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

z तलावातील पाणी प्रदूषित होत असल्यामुळे महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण संस्था आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या सहकार्याने काम सुरू आहे.

असा आहे पवई तलाव

पवई तलाव 1891 मध्ये निर्माण करण्यात आला असून त्याचा संपूर्ण जलव्याप्त परिसर 223 हेक्टर इतका आहे. सुमारे 6.6 किलोमीटरचा परिघ असलेल्या पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 600 हेक्टर वर पसरलेले असून तलावाची जलधारणा क्षमता ही सुमारे 5 हजार 455 दशलक्ष लिटर इतकी आहे. पवई तलावाचे पाणी हे पिण्याव्यतिरिक्त इतर प्रयोजनांसाठी उपयोगात येते.