मागील 10 वर्षांचा वचपा काढा अन् भाजपला त्यांची जागा दाखवा, प्रणिती शिंदे यांचे आवाहन

मागच्या दहा वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सरकार तरुण, महिला, शेतकरी, कामगार यांची केवळ फसवणूक करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी यावेळेस काँग्रेसला मतदान करून भाजपला त्यांची जागा दाखवा, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान केले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघांच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन गाव भेट दौरा सुरू केला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेत म्हणाल्या की, ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’, या शब्दात एवढी ताकद आहे की, कोणतेही आव्हान उचलण्याचे बळ मिळते. त्यामुळे मला नक्कीच स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अक्कलकोटसह सोलापूर लोकसभेतील जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल.

लोकांनी भाजपच्या आश्वासनाला भुलून त्यांना भरभरून मते दिली. पण भाजपने जनतेचा अपेक्षाभंग केला, एकही आश्वासन पूर्ण केले नाही. एकीकडे बेरोजगारी, महागाई वाढत आहे, दुसरीकडे शेतीमालाला हमीभाव नाही. खतांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. शेतीसाठीच नाही तर जनावरांसाठी देखील पाणी मिळणे कठीण झाले आहे. चारा छवण्या नाहीत. मात्र भाजपाचे लोकप्रतिनिधी यावर बोलणार नाहीत. कारण तिथे हुकूमशाही आहे. म्हणूनच यावेळी आपल्याला ही हक्काची लढाई जिंकायची आहे. मागील दहा वर्षाचा वचपा काढण्यासाठी सोलापूरची लेक म्हणून तुम्ही आशीर्वाद स्वरूपात मला मतदान करा, असे आवाहनही प्रणिती शिंदे केले.

Lok Sabha Election 2024 – नाशिकसाठी आता भुजबळांनीही बाह्या सरसावल्या, केले सूचक विधान

400 पारच्या घोषणा देणारा भाजप बिथरलेला आहे. त्यामुळेच अरविंद केजरीवालांना अटक करण्यात आली. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. काँग्रेसची खाती गोठवण्यात आली. मात्र हे करण्याची तुम्हाला गरज का भासली? असा सवाल करत प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.