कटरच्या धाकाने लुटमार करणार्‍यांना अटक, शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

कटरचा धाक दाखवून पादचार्‍यांना लुटणार्‍या एकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. तर, त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यांच्या एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.

विनायक गणेश कापडे (21, रा. विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, मंगेश काकडे या त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत एकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. फिर्यादी हे 8 जुलै रोजी रात्री एकच्या सुमारास शिवाजी पुतळा चौक परिसरातून निघाले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना कटरचा धाक दाखवून लुटले. त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम चोरून आरोपी पसार झाले. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना शिवाजीनगर पोलिसांनी परिसरातील दीडशे ते दोनशे सीसीटीव्हींची तपासणी केली. तांत्रिक तपासावरून गुुन्ह्यातील संशयीत अल्पवयीन तरूणाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यानूसार कापडे याला दळवी रुग्णालय परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने, गुन्हे निरीक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रताप साळवे, अर्जुन नाईकवाडे, अविनाश भिवरे, रणजित फडतरे, प्रवीण रजपूत यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.