वाहतूक कोंडीत पुण्याचा जगात सातवा क्रमांक, वाहतूक कोंडीची समस्या तत्काळ दूर करण्याची वडेट्टीवारांची मागणी

पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. मेट्रोची नियोजन शून्य कामे, ढिसाळ नियोजन यामुळे पुणेकर हैराण आहेत. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीमुळे विशेषत: विद्यार्थ्यांना त्रास होत असून याला जबाबदार मेट्रो आणि पालिका प्रशासन आहे असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ही समस्या दूर करण्यासाठी मेट्रो प्रशासनाला तत्काळ वठणीवर आणले पाहिजे. पालिका प्रशासनाने याबाबत काटेकोर नियोजन करावे. अन्यथा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे पेपर चुकण्याचा घटना पुन्हा घडतील अशे वडेट्टीवार यांनी म्हटले. प्रशासनाने वेळीच जागे होऊन पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कळीचा मुद्दा आहे. पुण्यात विकासाच्या बाता मारणाऱ्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी परीक्षेला वेळेत पोहोचणार कसे? हा पुण्यातील पालकांच्यासमोर प्रश्न आहे. रिक्षा, ओला, उबेरने परीक्षेला जाणे सर्वांना परवडणारे नाही याकडे वडेट्टीवारांनी लक्ष वेधले.

शिवाजीनगर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठादरम्यान आचार्य आनंदऋषीजी चौकात तसेच पाषाण, औंध, बाणेरकडे जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे नियोजनबद्ध पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. महापालिका प्रशासन नागरिकांकडून कोट्यवधींचा कर वसूल करते, मग चांगले रस्ते, पायाभूत सुविधा उपलब्ध करून का देत नाही? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.

वाहतूक कोंडीत पुण्याचा जगात सातवा क्रमांक आहे. टॉम टॉम या आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या, शहरात सुरू असलेली नियोजनशून्य विकास कामे, ही वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे आहेत. पण पुण्यातील सत्ताधारी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांना वेगळा मार्ग आरक्षित असल्याने त्यांना जनतेचा त्रास दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे.