अदानींनी 32 हजार कोटींचा घोटाळा केला, राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

उद्योगपती गौतम अदानी यांनी कोळसा आयात करून त्याच्या किमती चढवून सांगितल्या. त्यामुळेच वीज प्रचंड महागली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समहतीशिवाय हे होऊच शकत नाही. अशा प्रकारे अदानी यांनी तब्बल 32 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला असून त्यांनी जनतेला अक्षरशः लुबाडले आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

अदानी यांच्यात असे काय आहे की सरकार त्यांची अजिबात चौकशी करत नाही. अदानींना जे हवे ते मिळते, त्यांच्यामागे अशी कुठली शक्ती आहे, असा सवालही राहुल गांधी यांनी या वेळी केला. राहुल गांधी यांनी ‘फायनान्शियल टाइम्स’ या वृत्तपत्रातील लेखाच्या हवाल्याने अदानींवर आरोप केले. अदानी इंडोनेशियातून कोळसा खरेदी करतात. तेथून तो कोळसा हिंदुस्थानात येईपर्यंत त्याच्या किमती दुपटीने वाढलेल्या असतात. त्यामुळे वीज कडाडते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. अदानी यांनी कोळशाच्या किमती चढवून सांगितल्यामुळे वीज महागली. त्याचा भुर्दंड जनतेला सोसावा लागला. जनतेचा खिसा कापून अदानी यांनी 32 हजार करोड रुपये कमावले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.